जळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील बंडाच्या पवित्र्यात!

उद्या भूमिका स्पष्ट करणार; भाजपाच्या अडचणीत वाढ

0
पारोळा । जळगाव मतदारसंघातून तिकीट कापल्याने विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील नाराज झाले असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याचे संकेत मिळाले आहेत. उद्या दि.26 रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून पुढील भूमिका मांडू असे खा. पाटील यांनी आज त्यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. खा. पाटील यांनी बंड पुकारलेच तर भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत.

पत्रकार परिषदेवेळी अमळनेरचे माजी आ.बी.एस.पाटील, माजी नगराध्यक्ष बजरंग अग्रवाल, सुरेंद्र बोहरा, प्रवीण दाणेज, तालुका अध्यक्ष अतुल मोरे, जिल्हा किसान सेलचे सुरेश सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खा.ए.टी.पाटील यांनी स्पष्ट केले की, 10 वर्षांपासून मतदारसंघात अनेक विषयांना चालना देवूनही तिकीट कापण्यात आले. विशेष म्हणजे याबाबत कोणतेही कारण दिले गेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना दिसून आल्याने याबाबत मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते भेटण्यासाठी येत आहेत. आपण याबाबत मेळावा घेवून, हितगुज करीत त्याची माहिती संघटनमंत्री विजय पुराणिक तसेच प्रदेश संघटनेकडे देणार आहोत.

खा. पाटील म्हणाले की, माझ्या विरोधात षड्यंत्र रचले गेले, जिल्हाध्यक्ष मागील सहा महिन्यापासून त्यांच्या उमेदवारासाठी लॉबिंग करीत होते. त्यांनी आपल्या पदाचा वापर स्वतःच्या घरातील उमेदवारासाठी करून माझ्यावर अन्याय केला आहे. मागील 10 वर्षात आपल्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसून भर रस्त्यावरही जनतेची कामे केली, तरी जिल्ह्यातील काही गटांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही खा. पाटील यांनी केला.

माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा म्हणाले की, 4 लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार्‍या खासदाराचे तिकीट कापले जाणे गैर असून याबाबत संघटनेकडे जाब विचारणार आहोत. तालुकाध्यक्ष अतुल मोरे यांनी सांगितले, हा मेळावा पक्ष घेत असून यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडली जाणार आहे. त्यांच्या मतामुळे जिल्हाध्यक्षांच्या विरोधात तालुका प्रमुखांची भूमिका असे चित्र दिसून आले. पत्रकारांनी अपक्ष लढण्याबाबत विचारले असता कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर आपली पुढील रणनीती राहील, असे स्पष्ट करीत दि.26 रोजी 6 वाजता बालाजी मंदिर परिसरात जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे खा.पाटील यांनी स्पष्ट केले.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ.स्मिता वाघ यांनी पारोळा येथे ए.टी.पाटील यांची भेट घेतल्याचे त्यांनी मान्य केले. समर्थकांनी मुक्ताईनगर येथे जावून आ.एकनाथराव खडसे यांच्याकडे व्यथा मांडीत अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. गरज भासल्यास मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील मेळाव्याचे आमंत्रण दिले जाईल, असे खा.ए.टी.पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*