Type to search

आवर्जून वाचाच ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : क्रांतिकारी मुनिश्री आणि अहिंसा परमो धर्म:

Share
अहिंसा आणि प्रेमाने जग जिंकता येते. एवढा जरी संदेश प्रत्येकाने मुनिश्री तरुण सागर यांच्या जीवनचरित्रातून घेतला तरी पुरेसा आहे.

संथारा म्हणजे आत्महत्या आहे काय आहे? मध्यंतरी या विषयावर मोठा वाद घडून आला. संथारा, प्रायोपवेशन अशी सर्वांचीच चर्चा झाली; पण एका श्रावकाने दिलेले उत्तर मोठे मार्मिक आणि मनाला भिडणारे आहे. ते म्हणतात की संथारा म्हणजे परमोच्च अहिंसा. माझ्या जगण्यातून सुद्धा या विश्वातील घटकांना बाधा येता कामा नये, त्यांना त्रास होता कामा नये, कोणतीही हिंसा होता कामा नये. हे ते अहिंसेचे परमोच्च तत्व. (अर्थात यालाही वेगळे मत आणि मतप्रवाह असू शकतात)

पण आज हे संथारा व्रत पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे जैन मुनिश्री तरुणसागरजी महाराज यांचे महानिर्वाण. आजारपणानंतर त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि आज शनिवारी पहाटे तीन वाजून १८ अनेक ज्येष्ठ जैन मुनींच्या सान्निध्यात ते समाधीस्त झाल्याचे तरुण सागर आश्रमाने कळविले. केवळ जैनच नव्हे, तर हिंदू धर्मासह इतर धर्मातही त्यांचे अनुयायी आणि चाहते होते. आज जगभरातील हे चाहते हळहळत आहेत.

हे सर्व विश्व केवळ मानवासाठी निर्मित नाही, तर त्यावर येथील प्राणी, पक्षी, किटक, वनस्पती आणि असंख्य सजीव जीवजंतू यांचाही हक्क आहे. विश्वाचा हा परिप्रेक्ष्य त्यांचाही आहे. म्हणून प्राणीमात्रांबद्दल आणि वृक्षलतांबद्दलही प्रेमभाव जपला पाहिजे. त्यांनाही आदराची वागणूक दिली पाहिजे.. हे तत्त्व आहे, अहिंसेचे.

[button color=”” size=”” type=”square” target=”” link=””](नाशिकच्या पवन पाटणी, अध्यक्ष, अंजनगिरी तीर्थ, नाशिक यांच्याकडे मुनिश्री तरुण सागर महाराजांचा निवास असे. त्यांच्याच संग्रहातील ही निवडक छायाचित्रे)[/button]

माणसाने माणसांप्रतीसुद्धा अहिंसेचे प्रदर्शन करायला हवे. प्रत्येकाबद्दल प्रेम हवे, सहिष्णुता हवी आणि इतकेच नव्हे, तर ज्याप्रमाणे आपल्या गरजा असतात तशाच इतर मानवांच्याही असतात, म्हणून खूप हव्यास न बाळगता अपरिग्रह अर्थातच असंग्रह वृत्ती बाळगली पाहिजे. अहिंसेचे हे महान तत्व भारतभूमीला जैन धर्माचे २४वे तीर्थंकर वर्धमान महावीरांनी दिले. गौतम बुद्धांनीही हीच शिकवण जगाला दिली.

आज जे काही शांततेसाठी, सर्व जगाच्या कल्याणासाठी जो काही मानवसमूह प्रयत्नशील आहे. त्या प्रत्येकाच्या मनात बुद्ध आणि महावीरांची सहिष्णुता आणि अहिंसा असतेच असते. सत्य, अहिंसा, अचौर्य, अपरिग्रह आणि ब्रम्हचर्य ही पाच महान तत्वे जैन धर्माने आपल्याला दिलीत. मी नेहमीच सत्य वागेल, न्यायाने राहीन, मी कायिक वाचिक आणि मानसिकही कुणाचीही कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही. मी दुसऱ्याची वस्तू चोरणार नाही. गरजेपेक्षा जास्त वस्तू या नेहमी दु:खाचेच कारण ठरतात आणि मानवतेच्या प्रगतीत बाधा आणतात. म्हणून मी आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह करणार नाही, म्हणजेच अपरिग्रह वृत्ती धारण करेन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रह्मचर्य. आताच्या काळात गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठी आपले चारित्र्य, एकनिष्ठता हेच ब्रह्मचर्य.

महावीरांच्या याच तत्वाने महात्मा गांधीजी प्रभावित झाले होते आणि पुढे भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी याच तत्वांचा उपयोग त्यांनी केला. त्यांच्या अहिंसा सत्याग्रहाने तर शस्त्रधारी ब्रिटिशांनाही नमावे लागले हा इतिहास आहे. पुढे गांधीजींचे शिष्य आचार्य विनोबाजी भावे यांनी या सर्व तत्वांचा आपल्या महान ज्ञान आणि अभ्यासाच्या जोरावर प्रचार केला.

भूदान चळवळीचे प्रणेते असलेल्या विनोबाजींचे स्मरण सर्वसामान्यांना चिरकाल राहते ते त्यांनी सोप्या भाषेत लिहिलेल्या गीताई आणि गीता प्रवचनांमुळे. त्यांचे काम केवळ गीतेपुरतेच मर्यादित नव्हते, तर उपनिषदांसह कुराण, बायबल, बौद्ध, जैन या धर्मांचा अभ्यास करून त्यांनी त्या त्या धर्माचे सर्वाना मार्गदर्शक होईल असे सोप्या भाषेतील सार लिहून ठेवले आहे. जैन धर्मातील सर्व पथांच्या मुनि आणि आचार्यांची एक परिषद बोलावून हे जैन तत्त्वज्ञान ग्रंथरूपाने एकत्र केले. हे ग्रंथ आजही सर्वांना प्रेरणादायी ठरत आहेत.

धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे दिवस आता भरले आहेत. त्यांना कधीतरी जावयाचेच आहेत. थोडी दूरदृष्टी असेल, तर तुम्हाला कळेल की भविष्यात कोणत्या शक्ती जगावर राज्य करणार आहेत? त्या आहेत, अध्यात्म आणि विज्ञान- हा क्रांतिकारी विचार विनोबाजींचाच. आज वर्तमानात काही प्रमाणात त्याची प्रचिती येत आहे.

मुनिश्री तरुण सागर हे सुद्धा क्रांतिकारी संत म्हणून ओळखले जायचे ते आपल्या परखड विचारांनी. अगदी रावापासून ते रंकापर्यंत सर्वजण त्यांना भेटत असत. त्यांचे विचार ऐकायला उत्सुक असत. त्यांच्या प्रवचनांनी अनेकदा वादही निर्माण केले होते. ते म्हणत माणसाने माणसाला प्रेमाने जिंकायला हवे. तुम्ही तलवारीच्या जोरावर अर्थातच हिंसेच्या जोरावर भलेही विजयी मिळवू शकता, पण तुम्ही एखाद्याचे प्रेम जिंकू शकणार नाही.

स्त्रीभ्रूण हत्येच्या ते विरोधात होते. ज्या घरात मुलगी नाही, त्या घरात आपल्या कन्येचा विवाह करून देऊ नका. इतकेच नव्हे, तर साधू संतांनीसुद्धा त्या घराची भिक्षा घेऊ नका, असे परखड विचार ते मांडत असत. बदल किंवा परिवर्तन हे नेहमी स्वत:पासूनच होत असते. आपण आपल्या परिवारातील सदस्यांमध्‌ये बदल घडवू शकणार नाही, मात्र आपण स्वत:मध्ये तर नक्कीच बदल घडवू शकतो. तेव्हा आधी स्वत:त बदल घडविण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या मुळे जगात लोक दु:खी होत असतील, तर समजून चला की सर्वात मोठे पाप तुम्ही करत आहात. अशा पापाचे धनी होऊ नका. असे काम करा की तुमच्या जाण्यानंतरही लोकांनी दु:ख करत आसवे ढाळली पाहिजेत, तर तुम्ही खरे पुण्यवान आहात असे सिद्ध होईल. असे अनेक महान विचारतत्व आपल्या लेखन आणि प्रवचनांमधून तरुणसागर यांनी दिले. त्यांच्या याच विचाराचा आधार घ्यायचा झाला, तर आज खरेच त्यांच्या जाण्याने लाखो लोक हळहळत आहेत. आसवे गाळत आहेत.

विनोबाजी भावे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अन्न-जल त्याग करून प्रायोपवेशन केले. जैन धर्मात हेच तत्व संथारा व्रताने कार्यरत आहे. सर्वांनाच संथारा व्रत झेपते आणि साधते असे नाही. मात्र साधनेत उच्च अवस्थेला पोहोचलेले गृहस्थाश्रमी असोत किंवा अहिंसा परमो धर्म: मानून प्रेमाची, अहिंसेची, त्यागाची शिकवण देणारे तरुण सागरजींसारखे मुनिश्री असोत; त्यांचे संथारा व्रत आजच्या हिंसेने भरलेल्या विचित्र काळातही सहजपणे परमोच्च अहिंसेचे तत्व शिकवून जाते. हे नक्की.

  • पंकज जोशी (digi.edit1@deshdoot.com)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!