Type to search

जगतापांचे नाव दुसर्‍या यादीत

Featured सार्वमत

जगतापांचे नाव दुसर्‍या यादीत

Share

गडाखांच्या नावावर पुनर्विचार शक्य ?

अहमदनगर/मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीने लोकसभेच्या 11 उमेदवारांची यादी गुरूवारी जाहीर केली. या यादीत मावळचे संभाव्य उमेदवार पार्थ अजित पवार व नगरचे आ.अरुणकाका जगताप यांचे नाव नाही. शुक्रवारी किंवा शनिवारी जाहीर होणार्‍या यादीत त्यांचे नाव समाविष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगर दक्षिणेच्या उमेदवारीबाबत पवारांकडून गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा गडाखांच्या नावाची चाचपणी करण्यात आल्याचे समजते. नेवासा आणि शेवगाव मतदारसंघात काही ‘सन्मानजनक तोडगा’ निघाल्यास गडाख पुनर्विचार करू शकतात, अशीही कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र गडाख आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास आ.जगतापांचे नाव जाहीर केले जाईल, असे समजते.

डॉ.सुजय विखेंना उमेदवारी नाकारल्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी नगर दक्षिणेबाबत अधिकच सतर्क झाली आहे. गुरूवारी पक्षाने पहिली यादी जाहीर केली. या यादीत आ.जगताप यांच्या नावाचा समावेश नसला तरी त्यांची उमेदवारी अंतिम असल्याचे पक्ष सुत्रांनी सांगितले. मात्र पवारांनी गडाख या नावासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याची चर्चा आहे. गुरूवारी पवारांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याशी पुन्हा एकदा फोनवर चर्चा केल्याचे समजते. मात्र याबाबत कोणताही दुजोरा मिळू शकला नाही. ‘1991ची लढत’ या आपल्या मुद्याला प्रत्यक्ष राजकीय मैदानावर अपेक्षीत परिणाम देण्यासाठी पवारांकडून हे प्रयत्न सुरू असावेत, असा कयास आहे. दरम्यान, गडाख यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार जाहीर केली आहे. मात्र गडाख-घुले वादातील नेवासा व शेवगाव विधानसभा मतदारसंघाबाबत काही ‘सन्मानजनक तोडगा’ काढण्यात राष्ट्रवादीचे हायकमांड यशस्वी ठरले तर पुन्हा एकदा नवे समिकरण जन्म घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र या जर तरच्या गोष्टी प्रत्यक्षात आकार घेेणे शेवटच्या टप्प्यात कठीण असल्याचेही मत एकाने ‘सार्वमत’कडे नोंदविले.

मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली. त्यात ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील, बारामती – सुप्रिया सुळे, बुलडाणा – राजेंद्र शिंगणे, सातारा – छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूर – धनंजय महाडिक, जळगाव – गुलाबराव देवकर, रायगड- सुनील तटकरे, ठाणे – आनंद परांजपे, परभणी – राजेश विटेकर, कल्याण – बाबाजी पाटील, लक्षद्वीप – मोहम्मद फैजल यांचा समावेश असून हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!