एसटी तोट्यात आहे का?; पुरोगामी संस्थांचा महामंडळाला सवाल

0
नाशिक । बसगाड्यांच्या शहर आणि ग्रामीण भागातील फेर्‍या एस.टी. महामंडळाने आर्थिक तोटा असल्याचे सांगून बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. एस.टी. खरेच तोट्यात आहे का, असा सवाल शहरातील पुरोगामी, स्वयंसेवी संस्थांनी एसटी महामंडळाला निवेदनाद्वारे केला आहे.

एन.डी.पटेल रोडवर एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर सीटू, आयटक, घंटागाडी कर्मचारी युनियन, हॉकर्स युनियन, शिक्षण संस्था बाजारीकरणविरोधी मंच, मूलभूत हक्क आंदोलन छात्रभारती, युवा परिषद, मानव उत्थान मंच, दक्षिणायन आदी स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर एस.टी. महामंडळाविरोधात घोषणाबाजी करून नाशिकच्या बस नागपूरला पळवल्याच्या निषेध व्यक्त केला.

एसटीच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात एसटीची बस वाहूतक अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण यंदा तोटा सांगून महामंडळाने अनेक फेर्‍या कमी केल्या आहेत. तसेच बससेवा बंद करण्याचे सूतोवाच केले आहे. शहर बससेवेच्या फेर्‍या बंद केल्याने विद्यार्थी, सामान्य प्रवाशांची गैरसोय झाली आहे. अनेक विद्यार्थी लटकून प्रवास करीत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. कामगारांनाही वेळेवर कामकाजाच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत आहेत.

एसटी महांमडळ आर्थिक तोट्याचे कारण सांगून बससेवेला पूर्णविराम देण्याच्या विचारात जर असेल तर एसटी खरच तोट्यात कशी काय गेली? शासनाने एसटीला 100 अद्ययावत बसेस शहर वाहतुकीसाठी दिल्या होत्या. एसटीची प्रत्येक गाडी ही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक करते. तरीही तोटा कसा काय?

शहर बससेवा बंद झाली तर खासगी वाहने आणि इतर साधनांची वर्दळ शहरात वाढणार आहे, असे म्हणून स्वयंसेवी संस्थांनी विभाग नियंत्रकांकडे एसटीच्या फेर्‍या पूर्ववत करण्याची मागणी केली. नफा तोट्याचे गणित राज्य परिवहन महामंंडळाने जाहीर करावे. शहराचे पालकत्व घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे सुचवले. त्याचबरोबर तोटा भरून काढण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर डॉ.डी.एल.कराड, शांताराम चव्हाण, कॉ. श्रीधर देशपांडे, अ‍ॅड. वसुधा कराड, मुकुंद देशपांडे, डॉ. मिलिंद वाघ, कॉ. राजू देसले, महादेव खुडे, डॉ. राहित कसबे, नितीन मते, जगबीर सिंग, श्यामला चव्हाण, वासंती दीक्षित, दिनेश सातभाई आदींची नावे आहेत. यावेळी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

LEAVE A REPLY

*