IPL Blog : आज मुंबई भिडणार रॉयल चॅलेंजर बंगळूरशी; सामन्याची वेळ रात्री ८ वाजता

0

मुंबई | आज वानखेडेवर मुंबईचा सामना बंगळूरसोबत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सलग तीन पराभव स्वीकारावे लागल्यामुळे मुंबई आजच्या सामन्यात विजय मिळविण्याच्या उद्देशाने उतरणार आहे. मुंबई आणि बंगळूरमध्ये आतापर्यंत २३ सामने झाले आहेत. यात मुंबईच्या नावे १५ विजय आहेत तर बंगळूरच्या संघाने ८ विजय मिळवले आहेत.

मुंबईचे पारडे जड असले तरी यंदाच्या सीजनमध्ये मुंबई अद्यापही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. यंदाच्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरला (आरसीबी) एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर दोन सामन्यांत पराभव    पत्करावा लागला आहे.

आजचा सामना हा टीम इंडियाचा कर्णधार विरुद्ध उपकर्णधार असा रंगणार आहे. आजच्या सामन्याची सर्वच क्रिकेट रसिकांना उत्सुकता लागून असून अनेकजन सर्व कामे निपटून रात्री ८ वाजता टीव्हीसमोर जाऊन बसणार आहेत.

आरसीबीचा स्फोटक फलंदाज विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स यांच्यापासून मुंबईला सावध राहावे लागणार आहे. हे दोन्ही फलंदाज मैदानावर टिकले तर समोरच्या टीमची वाट लावतात असा इतिहास आहे. या दोघांना लवकरात लवकर बाद करण्यासाठी मुंबईला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे.

तर तिकडे मुंबईचे फलंदाज ईशान किशन, सुर्यकुमार यादव, इवान ल्युयीस, रोहित शर्मा, अष्टपैलू कृणाल आणि हार्दिक पंड्या फॉर्ममध्ये आहेत.

मुंबईच्या गोलंदाजांचा विचार केला तर मयंक मार्केंड, मॅक्लेनघन, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

आरसीबीच्या फलंदाजांची रीघ मोठी आहे. सध्या ब्रॅडण मकालम, एबी डिव्हीलियर्स, डीकॉक आणि विराट सर्व जगातील अग्रभागी गणले जाणारे फलंदाज आहेत.

आरसीबीकडे पवण नेगी, क्रिस व्होक्स, कॉलेंडी, ग्रंडहोम व मनदीप सिंग सारखे अष्टपैलूदेखील आहेत.

आरसीबीकडे गोलंदाजदेखील अनुभवी आहेत. यात कुलवंत ख्रेजोलीया, उमेश यादव, क्रिस व्होक्स, यजुवेन्द्र चहल असे गोलंदाज असून अनुभवातून मुंबईला कचाट्यात सापडवू शकतो.

मुंबईचे वानखेडे स्टेडीयमची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी पोषक आहे. नाणेफेक जिंकणारा कर्णधार गोलंदाजी स्वीकारतो. तर नाणेफेक हरणारा कर्णधारापुढे किमान १८० ते २०० धावांचा डोंगर उभारण्याचे लक्ष्य ठेवून फलंदाजीची रणनीती आखावी लागते.

रोहित शर्माला अद्याप फॉर्म गवसलेला नाही. मयंक मार्केंड वगळता अद्याप मुंबईच्या गोलंदाजांना गोलंदाजीचा सूर गवसला नाही.

तर आरसीबीची मधली फळी यंदाच्या आयपीएलमध्ये कोसळताना दिसून येते. उद्याच्या सामन्यात मक्लेघनला स्थान दिले जाऊ शकते.

– सलील परांजपे, नाशिक.

 

LEAVE A REPLY

*