गुंतवणूदारांचा ‘सेबी’वर मोर्चा काढणार

पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा जिल्हा मेळाव्यात निर्धार

0
नाशिकरोड | दि. १ प्रतिनिधी – देशभरातील लाखो गुंतवणुकदारांची फसवणूक करणार्‍या पॅनकार्ड क्लबची ५९०० कोटीची मालमत्ता सेबीने आजपर्यंत ताब्यात घेतली आहे. तिची त्वरित विक्री करून गुंतवणूकदारांना पैसे मिळवून द्यावेत, या मागणीसाठी डिसेंबरअखेर सेबीच्या मुंबई कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती इन्व्हेस्टर ऍक्शन फोरमचे निमंत्रक विश्वासराव उटगी यांनी दिली.

उपनगर येथील इच्छामणी लॉन्समध्ये पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा जिल्हा मेळावा झाला. त्यावेळी उटगी बोलत होते. व्यासपीठावर फोरमचे अध्यक्ष ए.एस. पेडणेकर, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक गोरे, सचिव व्ही.सी. बेर्डे, व्ही.पी. गोसावी, सी.ए. मोरे, एम.एन. लवंगरे, आर.टी. मेटकरे, डी.के. व्यवहारे, एस.आर. घाग, राजू देसले आदी उपस्थित होते.

याप्रसंगी उटगी म्हणाले, पॅनकार्ड क्लब कंपनीत देशभरातील ५१ लाख लोकांनी गुंतवणूक केली आहे. यात २७ लाख महाराष्ट्रातील तर तीन लाख नाशिक जिल्ह्यातील आहेत. या सर्वांची ७०३५ कोटी रक्कम अडकली आहे. १९९७ साली स्थापन झालेल्या पॅनकार्ड क्लबने सहा वर्षात दुप्पट आणि तीन वर्षात तिप्पट गुंतवणूक परताव्याचे आमिष दाखवून देशभरातील लाखो गुंतवणूकदारांना गंडा घातला.

सतरा वर्षात कंपनीने १४ लाख गुंतवणूकदारांना २७०० कोटी परत केले. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून लाखो गुंतवणूकदारांचे पैसे परत केलेले नाहीत. गुंतवणूकदार आर्थिक निरक्षर असल्याचा गैरफायदा अशा कंपन्या घेतात. बहुतेक चिटफंड हे चिटींग फंड झाले आहेत.

१९९९ मध्ये सरकारने गुंतवणुकदारांसाठी कायदा केला. सेबीचा कायदा १९९२ मध्ये झाला तरी हर्षद मेहता, केतन पारेख यांनी शेअरबाजारात लाखों गुंतवणुकदारांना लुबाडले. कायद्याचे वस्त्रहरण झाले आहे. सेबीने १२ मे २०१७ रोजी पॅनकार्ड क्लब कंपनीचे व्यवहार बंद करून गुंतवणुकदारांचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. ते मिळण्यासाठी फोरमने गुंतवणकदारांची जिल्हा बैठका घेऊन जागृती सुरू केली आहे.

पैसे मिळवण्यासाठी नुसते मोर्चे काढून उपयोग नाही तर सेबीचा फार्म भरुन द्यावा. चिटफंड व झटपट श्रीमंतीची स्वप्ने दाखवून सामान्य जनतेला अनेक कंपन्यांनी लुबाडले. माजी सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक गोरे म्हणाले यांनी, पॅनकार्डच्या गुंतवणुकदारांनी मार्केटिंग एजन्टवर पोलिस केस न करता त्यांना साक्षीदार करुन केस भक्कम करावी. पोलिस प्रकरणात मदत करण्यास आपण तयार असल्याचे सांगितले. राजू देसले यांनीही फोरमला सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

*