Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनहोणार, सगळ्यांचा कार्यक्रम होणार...; काय म्हणताय 'समरेणू'चे कलाकार?, पाहा व्हिडीओ

होणार, सगळ्यांचा कार्यक्रम होणार…; काय म्हणताय ‘समरेणू’चे कलाकार?, पाहा व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रत्येकाच्या आयुष्यात सुरुवात महत्वाची नसते तर शेवट महत्वाचा असते. अशाच टॅगलाईनवर आधारित आमचा समरेणू (Samrenu) हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच गुंतवून ठेवेल. चित्रपटाच्या शेवटपर्यंत प्रेक्षकांचा इंटरेस्ट कमी होणार नाही. त्यामुळे ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, अशी आशा लेखक, दिग्दर्शक महेश डोंगरे (Mahesh Dongare) यांनी व्यक्त केली…

- Advertisement -

दि. १३ मे रोजी सम आणि रेणू यांच्या अनोख्या प्रेमकहाणीवर आधारीत चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश डोंगरे, अभिनेत्री रुचिता मांगडे (Ruchita Mangade), संगीत दिग्दर्शक सुरज-धीरज (Suraj-Dhiraj), आणि खलनायक भरत लिमन (Bharat Liman) यांनी दै. देशदूतच्या (Deshdoot) कार्यालयाला भेट दिली. यावेळी कलाकारांनी या चित्रपटाबद्दल माहिती दिली. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध जोशी (Aniruddha Joshi) यांनी संवाद साधला.

महेश डोंगरे म्हणाले की, एका गावात घडणारी ही प्रेमकहाणी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मी दिग्दर्शक आणि कलाकार म्ह्णून पदार्पण करत आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. पहिलाच चित्रपट असल्याने थोडे दडपण आहे आणि तितकीच उत्सुकताही आहे.

प्रेमाचा त्रिकोण असला तरी चित्रपटाची कथा वेगळी आहे. ‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय’ या टॅगलाईननुसार चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांसाठी एक धक्काच असणार आहे. आता हा धक्का सुखद की दुःखद असेल, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.”

रुचिता मांगडे म्हणाल्या की, मी रेणू नावाची भूमिका साकारत आहे. रेणू ही २० वर्षांची तरुण विधवा असून तिला ६ ते ७ महिन्यांचे बाळ आहे. एका विधवा महिलेला आपल्या आयुष्यात अनेक खस्ता खाव्या लागतात. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अशेच काही प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

संगीत दिग्दर्शक सुरज-धीरज म्हणाले की, समरेणू’च्या गाण्यांना संगीतप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘समरेणू’च्या शीर्षकगीतातील सम आणि रेणूचे नजरेतून व्यक्त होणारे प्रेमही खूप भावणारे आहे. त्यामुळे उत्तम कथानक आणि सुमधुर गाणी असलेला ‘समरेणू’ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

खलनायक भरत लिमन म्हणाले की, मी एक पहलवान असल्याने लहानपणापासून मला नम्रतेची शिकवण मिळाली. हे पात्र साकारताना मला काही आव्हानांना सामोरे जावे लागलेच मात्र मला हि भूमिका साकारताना आनंद झाला.

सम्या आणि रेणूच्या प्रेमकहाणीत जबरदस्त ट्विस्ट असणार आहे. त्यांच्या प्रेमकहाणीचा शेवट त्यांना कोणत्या रंजक वळणावर घेऊन जाणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सूरज- धीरज यांचे संगीत लाभलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे.

तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा नामांकित गायकांचा आवाज लाभला आहे. या चित्रपटाची निर्मिती एम आर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या