महिला दिनविशेष मुलाखत : महिलांनो ‘का’ म्हणायला शिका?

0
नाशिक | दिनेश सोनवणे 
दरवर्षी ८ मार्च महिलादिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या महिलादिनाचे औचित्य साधत मराठी अभिनेत्री रुचा इनामदार हिच्याशी साधलेला संवाद…
माझा जन्म पुण्याचा. आई-वडील डॉक्टर असल्याने मुंबईत आलो. मी मुंबईतच लहानाची मोठी झाले. माझे आजोबा दि. इनामदार यांचा माझ्यावर प्रभाव होता. लहानपणापासूनच मला नृत्यात रस होता. आई-वडिलांनी माझ्यातले गुण ओळखून त्याच दिशेने शिक्षण देण्यास सुुरुवात केली.
पुढे मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, डेंटिस्टची पदवी घेतली. परंतु माझ्यातला कलाकार मला काही गप्प बसू देत नव्हता. त्यामुळे मी नियमित कलाकार म्हणून समोर येत राहिले. २०१४ साली मी ‘चिल्ड्रन ऑफ वॉर’ या चित्रपटातून माझे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले.
मराठीचा अभिमान आहेच, म्हणून मला ‘भिकारी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, मिळालेल्या संधीचं सोनं करत मी खूप मेहनतीने ‘‘भिकारी’ चित्रपटासाठी काम केले.
रुचा म्हणते, माझ्या आजी- आजोबांपासूनच मला खूप चांगले संस्कार मिळाले. आई-वडिलांनी मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे जगाच्या कानाकोपर्‍यात जाण्याचे धाडस मी करू लागले.
मात्र, आपल्याकडे रात्र-पहाट एक करून संसार हाकणारी महिलेचे स्थान मात्र अजून दुय्यमच राहिले आहे. सकाळी उठून मुलांचे आवरणे, पती, सासू सासर्‍यांचे आवरून, स्वयंपाक पाणी करून पुन्हा नोकरीवर हजर होणें.
सायंकाळी आल्यानतर पुन्हा स्वयंपाक, सर्वजण झोपल्याशिवाय तिला मात्र झोप येत नाही. रात्री उशिराने झोपून सकाळी उठणारी महिलेचे स्थान कसे दुय्यम असू शकतें? ती महान आहे, तिचा आदर केला पाहिजे, तिचे संरक्षण केले पाहिजे असेे मला वाटते.
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना मोकळीक नसते. सायंकाळी मुलींनी लवकर घरी यावे, याबाबत फोनाफोनी सुरू होते. तिला घरचा धाक असल्याने अर्धवट काम सोडून यावेे लागते. यामुळे तिच्या करिअरवर परिणाम होतो, यागोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.
अनेक ठिकाणी महिला सुरक्षेवर व्याख्याने दिली जातात. जनजागृती केली जाते. मुळात या गोष्टीची गरज का भासतेय याकडे बघितले पाहिजे. घरातूनच मुलाला जसे ट्रिट केले जाते, तसेच मुलीलाही करायला हवे. घरातून स्त्री-पुरुष हा भेदभाव नष्ट झाला की, त्याचा परिणाम हळूहळू समाजावर होऊन आपोआप महिलांप्रती आदरभाव निर्माण होण्यास मदत होईल.
मुंबईत जी महिला वावरते ती मुंबईत २४ तास काम करू शकते, ये-जा करू शकते असे मला वाटते. पण मुंबईच्या बाहेरची काही शहरे आहेत, तिथे वावरताना मला मात्र खरोखर भीती वाटत होती, हे तेव्हढेच खरे.
समाजातील वाईट प्रवृत्तींपासून वाचण्यासाठी आपण काळजी घ्यायलाच हवी. यासाठी महिलांनी स्वरक्षणावर भर दिला पाहिजे. कुठेही असल्या तरी तिथून निघण्याची ताकत त्यांच्यात यायला हवी. त्यांनी नाही म्हणायला शिकले पाहिजे. मुली वस्तू नसून व्यक्ती आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
रोजच धकाधकीच्या जीवनात महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिन्यातील स्त्री जीवनातील ‘ते चार दिवस आले’ तर आई-वडील-भाऊ यांच्याशी संवाद साधत नाहीत. दडवून ठेवतात. याचा विपरित परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. मुलींचे शरीर काळानुरूप बदलत असते. आई-वडिलांनी तिच्याशी संवाद साधायला हवा. यातून महिलांचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते, असे मला वाटतेे.

LEAVE A REPLY

*