Thursday, May 2, 2024
Homeधुळेमेंढ्या चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

मेंढ्या चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

धुळे । Dhule । प्रतिनिधी

जिल्ह्यातील शेत शिवारातून मेंढ्यांची चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा एलसीबीच्या पथकाने पदाफार्श केला असून या टोळीला राजस्थानातून जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून कारसह 4 मोबाईल असा एकुण सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चोरीच्या मेंढ्या खरेदी करणार्‍या व्यावसायीकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

खलाणे (ता.शिंदखेडा) येथील सोमा तुळशीराम ठेलारी यांच्या मालकीच्या 61 गावराणी मेंढ्या या भगतसिंग गिरासे यांच्या मालकीच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. दि. 24 जुलै रोजी ही घटना घडली होती. याबाबत ठेलारी यांच्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरही इतर ठिकाणी देखील मेंढ्या चोरीच्या घटना होत असल्यामुळे पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी अशा घटनांना आळा बसावा, यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सुचना दिल्या होत्या. गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना हा गुन्हा राजु बंजारा नामक व्यक्तीने केल्याची गुप्त माहिती मिळाली. राजू बंजारा हा राजस्थान राज्यातील कोटा येथील रहिवासी असून त्यानेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न होताच एलसीबीचे पथक राजस्थान येथे रवाना झाले होते.

पथकाने राजस्थानातील कोटा जिल्ह्यामधील ग्राम कलमका कुवा, तहसिल लाडपुरा येथून राजू हजारी बंजारा (वय 33) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा त्याच्या इतर चार साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. हे साथीदार पाली जिल्ह्यातील रोहट येथील असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने रोहट गाठून राजकुमार बलराज बंजारा (वय 25 रा.ग्राम भोरका कुवा, तहसिल झालका पाटण जिल्हा झालावाड), महेंद्र चुनिलाल बंजारा (वय 24 रा.ग्राम भोरका कुवा), शामराज परतीलाल बंजारा (वय 26 रा.ग्राम भोरका कुवा), पृथ्वीलाल हरीलाल बंजारा (वय 30 रा.ग्राम कानपुरा, राजस्थान) यांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी यापुर्वीही धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून मेंढ्या चोरी केल्याचे सांगितले. गुन्ह्यातील चोरी केलेल्या मेंढ्या देपालपूर येथील संतोष बडगुजर यास विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने देपालपुर गाठून संतोष राजाराम बडगुजर (वय 65 रा.तिलक मार्ग, देपालपुर, जि.इंदोर) यालाही ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली तीन लाखांची कार (क्र. आर. जे.17/यु.ए 2001) व 24 हजार रूपये किंमतीचे चार मोबाईल असा एकूण 3 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीला पुढील तपासासाठी शिंदखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई. बाळासाहेब सूर्यवंशी, असई. संजय पाटील. पोहेकॉ. संदीप सरग, प्रकाश सोनार, पोना. कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, अमोल जाधव, सुनिल पाटील, चालक कैलास महाजन, गुलाब पाटील यांच्या पथकाने केली.

राजस्थानातही गुन्हे

या आरोपींकडून शिंदखेडा, थाळनेर, धुळे तालुका व दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून इतरही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याबरोबरच राजस्थान राज्यातील कोतवाली, क्षिप्रा व कनवास पोलीस ठाण्यात देखील या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या