Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

स्पर्धा परीक्षेसाठी पहिलीपासूनच बौद्धिक क्षमता, सर्वसामान्य ज्ञान विषय

Share

जि. प. महिला बालकल्याण समितीचा कर्नाटक, तामिळनाडू अभ्यास दौरा

नाशिक । प्रतिनिधी

महिला व मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी म्हैसूर येथे शिवणकर्तन, ब्यूटी पार्लर, दुग्धजन्य पदार्थांचे प्रशिक्षण, घनकचरा प्रशिक्षण, महिलांचे आरोग्यविषयक प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण हाच उद्देश, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमता व सर्वसामान्य ज्ञान हा विषय, अशा उल्लेखनीय बाबी नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्यांंनी कर्नाटक व तामिळनाडू राज्यात केलेल्या अभ्यास दौर्‍यात प्रकर्षाने जाणवल्या.

कर्नाटक राज्यातील रामनगर-म्हैसूर जिल्ह्यात व तामिळनाडू राज्यातील उटी-कोईम्बतूर जिल्ह्यात महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा झाला. दौर्‍यात समिती सदस्य गीतांजली पवार-गोळे, सुनीता सानप, कमल आहेर, रेखा पवार, कविता धाकराव आदी सहभागी झाले होते. या दौर्‍यात अंगणवाडी केंद्र, जि. प. प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा यांना भेटी देण्यात आल्या.

रामनगर जिल्ह्यातील मायगनहलली येथील अंगणवाडी, जि. प. प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतीला भेट दिली. अंगणवाडी सेविका चंद्रमा यांनी कामकाजाची माहिती देताना बालकांना दररोज सकाळी दूध व दुपारचे जेवण दिले जाते. अंगणवाडीची वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 अशी आहे. मायगनहलली जि. प. प्राथमिक शाळेत पोषण आहार शिजवण्याचे ठिकाण (किचन शेड) अतिशय स्वच्छ, नीटनेटके होते. पोषण आहारात भात, सांबार, रस्सम दिले जाते. मातृभाषा कन्नड व इंग्रजी या दोन विषयात विद्यार्थी पारंगत असल्याचे जाणवले. स्पर्धा परीक्षेसाठी इयत्ता 1 लीपासून विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमता व सर्वसामान्य ज्ञान विषय शिकवला जातो. मायगनहललीचे सरपंच व सदस्यांनी गावांतर्गत विकासकामांची माहिती दिली. गावातील काँक्रिट रस्ते, भुयारी काँक्रिट गटारी, पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना, स्वच्छता, घनकचरा या बाबी प्रकर्षाने दिसून आल्यात.

सर्व माजी अध्यक्षांची छायाचित्रे

चामराजनगर जिह्यातील बसवपुरा अंगणवाडी सेविका महादेव अम्मा, मदतनीस मंगल अम्मा यांनी दूध व ताजा आहार वाटप होत असल्याने बालकांचे कुपोषण कमी असल्याचे सांगितले. म्हैसूर जिल्हा परिषदेत अध्यक्षांंची भेट घेऊन तेथील योजना व उपक्रमांची माहिती घेतली. महिला व मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी म्हैसूर येथेही शिवणकर्तन, ब्यूटी पार्लर, दुग्धजन्य पदार्थांचे प्रशिक्षण, घनकचरा प्रशिक्षण, महिलांचे आरोग्यविषयक प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगितले. महिला सक्षमीकरण हाच उद्देश असल्याचे दिसून आले. म्हैसूर जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षांच्या दालनात सर्व माजी अध्यक्षांची छायाचित्रे लावलेली दिसून आली. स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी महिला बचत गटांना कायमस्वरुपी स्थानिक बाजारपेठेत उत्पादित साहित्य विक्रीसाठी गाळे उपलब्ध करून दिले जातात.

प्लॅस्टिक बाटली विक्रीस बंदी

तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय असलेले उटी शंभर टक्के प्लॅस्टिकबंदी असून गावात एक व दोन लिटर पाण्याची प्लॅस्टिक बाटली विक्रीस बंदी आहे. कोणत्याही दुकानात फक्त कागदी किंवा कापडी पिशवी दिली जाते. उटी येथे मोठ्या प्रमाणावर चहा, कॉफीचे मळे असून तेथे भेट दिली. तसेच चहा पानापासून ते चहा पावडर बनवण्याच्या प्रक्रिया उद्योगास भेट देऊन पाहणी केली. दोन्ही ठिकाणी महिलांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून दिला जात असल्याचे निदर्शनास आले.

दौर्‍यामुळे ओळख

महिला व बालकल्याण समितीच्या अभ्यास दौर्‍यामुळे आमच्यासारख्या ग्रामीण भागातील महिलांना दुसर्‍या राज्यातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची माहिती व ओळख झाली. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महिला व बालकल्याण समिती सदस्यांनी शासनाचे आभार मानले.

– अश्विनी आहेर, सभापती

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!