माहिती अधिकारात माहिती न दिल्याने श्रीरामपूरच्या प्रांताधिकार्‍यांना 25 हजाराचा दंड

0
राहुरी (तालुका प्रतिनिधी) – माहिती अधिकारात माहिती मागवूनही न दिल्याने माहिती आयुक्तांनी श्रीरामपुरच्या प्रांताधिकार्‍यांना 25 हजाराचा दंड केला आहे. तसा आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे.

राहुरी खुर्द येथील सुभाष सुर्यभान गोरे यांनी दि. 6 जून 2013 रोजी श्रीरामपूर प्रांत कार्यालयाचे तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा शिरस्तेदार अशोक कोल्हे यांच्याकडे नवीन शर्त जमिनीच्या अदलाबदला संदर्भात शासन निर्णय व त्याबाबतचा आदेश, अर्ज आदी कागदपत्रांची माहिती मागविली होती. त्यांनी विहित मुदतीत माहिती दिली नाही. त्या अनुषंगाने कोणताही पत्रव्यवहार केला नाही. त्यामुळे गोरे यांनी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते.

याबाबत अपील सुनावणी होऊन गोरे यांना 15 दिवसांच्या आत विनामुल्य माहिती देण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, मुदत संपूनही व मागणी करूनही संबंधित माहिती अधिकार्‍यांनी माहिती दिली नाही. अखेर गोरे यांनी नाशिक येथे राज्य माहिती आयुक्तांकडे दि. 12 मार्च 2015 रोजी तक्रार केली होती.

माहिती आयुक्तांनी श्रीरामपूर येथे जनमाहिती अधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांना सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते हजर राहिले नाही. तसेच प्रांत कार्यालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

माहिती अधिकार 2005 चे कलम 20 (1) अन्वये 25 हजार रुपये शास्तीची कार्यवाही का करू नये? याचा लेखी खुलासा आदेश मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

मात्र, संबंधित अधिकार्‍यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे. त्यामुळे शिरस्तेदार व प्रांताधिकारी, श्रीरामपूर यांच्याविरूद्ध जिल्हाधिकार्‍यांंनी 25 हजार रुपये दंडाची कारवाई करण्याचा आदेश दिला असल्याची माहिती गोरे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*