‘इंदिरा आवास’प्रश्‍नी सौ. गडाखांचे पंतप्रधान मोदींना पत्र

0

थकलेल्या हप्त्यांबाबत लक्ष घालण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – इंदिरा आवास योजनेतील 2009-10 ते 2014-15 या कालावधीतील जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक घरकुलांचा दुसरा आणि तिसरा हप्ता थकला आहे. ऑनलाईन आणि अन्य कारणांमुळे सामान्य लाभार्थ्यांचे घरकुलाचे हप्ते थकीत असून याप्रश्‍नी केंद्र सरकारने लक्ष घालावे, तसेच थकीत अनुदान व्याजासह लाभार्थ्यांना द्यावे, अशी मागणी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई गडाख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात सभापती गडाख यांनी स्पष्ट केले, की 2009-10 ते 2014-15 या कालावधीतील जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कमीअधिक प्रमाणात घरकुलांचे हप्ते थकलेले आहेत. याप्रश्‍नी केंद्र व राज्य सरकारने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. एकट्या नेवासा तालुक्यात 200 घरकुलांचे तर जिल्हा पातळीवर दोन हजारांहून अधिक घरकुलांचे हप्ते थकले आहेत. घरकुलाचे अनुदान ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यास सुरुवात झाल्यापासून हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 2009-10 ते 2014-15 या काळातील घरकुलांचे काम पूर्ण झाले असून पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळालेला आहे. मात्र, त्यानंतरचे दोन हप्ते थकीत असून ही रक्कम लाभार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.

याप्रश्‍नी लाभार्थी ग्रामसेवकांकडे चकरा मारात असून त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्रस्त झाले आहेत. थकीत अनुदानाच्या पैशासाठी ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अनेक लाभार्थी हे गरीब व अशिक्षित असल्यामुळे मानहानी सहन करावी लागत आहे. तर तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागत असल्याने त्यांचा रोजगार बुडत आहे. यात लाभार्थ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. सामान्य जनतेचे होणारे हाल पाहवत नसल्याचे सभापती गडाख यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. सरकारकडे या विषयावर पाठपुरावा सुरू असून गरीब लाभार्थ्यांना व्याजासह अनुदानाची उर्वरीत रक्कम मिळायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*