तिसऱ्या वनडेतही दक्षिण आफ्रिकेला लोळवले; भारताचा १२४ धावांनी मोठा विजय

0

केपटाऊन । भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने दिलेल्या 304 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 40 षटकांत 179 धावांवर गारद झाल्याने भारताने 124 धावांनी दणदणीत विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर इतिहास घडवला. भारताच्या फिरकी गोलंदाजीपुढेे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुन्हा लोटांगण घातले.

भारताकडून यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराहला 2 बळी मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत भारताने 3-0 ने आघाडी घेतली आहे.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीचे नाबाद शतक आणि त्याला सलामीवीर शिखर धवनने दिलेली साथ यामुळे भारताने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 304 धावांचे आव्हान ठेवले.

विराट कोहली पहिल्या डावात भारताचा खर्‍या अर्थाने हिरो ठरला. त्याने 12 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 160 धावा ठोकल्या. विराटने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना आपल्या चौफेर फटकेबाजीमुळे सळो की पळो करून सोडले. आफ्रिकेचा एकही गोलंदाज विराटच्या धावांवर अंकुश लावू शकला नाही. तर शिखर धवनने 63 चेंडूत 76 धावांची खेळी बारा चौकारांनी सजवली.

रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीच्या शतकी भागीदारीने भारताला मजबूत स्थितीत आणले. शिखर धवन मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याच्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे 11 तर हार्दिक पंड्या 14 धावांवर बाद झाला.

केदार जाधवलाही काही खास कामगिरी करता आली नाही. तो एक धाव करून माघारी परतला. महेंद्रसिंह धोनीने 10 तर भुवनेश्वर कुमारने नाबाद 16 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून जेपी ड्युमिनीने सर्वाधिक 2 तर इम्रान ताहीर, आंदिले फेहुलकवायो, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडले.

स्कोरकार्ड जाणून घेण्यासाठी क्लिक करा

LEAVE A REPLY

*