भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिकेत बरोबरी

0
अडलेट : कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज शतक (१०४ धावा) आणि महेंद्रसिंह धोनीच्या (५५ धावा) अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ४ चेंडू व ६ विकेट राखून विजय मिळवला. फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय ऑस्ट्रेलियाला लाभदायक ठरला नाही.

शॉन मार्शचे (१३१ धावा) शतक वाया गेले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. ३ सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने दुसरा सामना जिंकून बरोबरी साधली आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे एकदिवसीय मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 299 धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी जलद सुरुवात केली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. धवन बाद झाल्यावर कोहली फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा सामना करताना कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील 39वे शतक झळकावले. कोहलीने 112 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 104 धावा केल्या.

कोहलीने या सामन्यात शतक झळकावले असले तरी त्याला भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. शतक झाल्यावर मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली बाद झाला. कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनीने आपल्या भात्यातील फटके बाहेर काढले आणि आपण मॅच फिनिशर कसे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. धोनीने 54 चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद 55 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.

शॉन मार्शच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 298 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पण शॉनने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगला आकार दिला. शॉनने 123 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 131 धावांची दमदार खेळी साकारली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने चार आणि मोहम्मद शमीने तीन बळी मिळवले.

LEAVE A REPLY

*