Type to search

Breaking News maharashtra नाशिक मुख्य बातम्या

अनधिकृत कृषीपंपांचा वीज वापर वाढल्याने रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण वाढले

Share

नाशिक दि. 16 | जिल्ह्यात पाऊस लांबल्याने कृषीपंपांचा वापर वाढला आहे. परिणामी भार वाढून वीज वितरण रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अधिकृत वीज वापर करणाऱ्या कृषीपंप ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी अनधिकृतपणे वीजेचा वापर करणाऱ्या कृषीपंप ग्राहकांना अटकाव करण्यात मदत करण्याचे आवाहन नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे.

पावसाने ओढ दिल्याने सध्या नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून कृषीपंपाचा वापर वाढला आहे. अधिकृतपणे वीजजोडणी घेऊन विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना पुरेशी वीज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र कृषीपंपांसाठी अनधिकृतपणे वीज वापरली जात असल्याने अनेक ठिकाणच्या रोहित्रांवरील भार वाढला असून रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

एकाच वेळी रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने रोहित्र दुरुस्ती यंत्रणेवर ताण आला असून नादुरुस्त रोहित्र वेळेत बदलणे अडचणीचे ठरत आहे. भार वाढल्याने उपकेंद्रातूनच फीडर ट्रिप होत आहेत. परिणामी कृषी ग्राहकांसह इतर वर्गवारीतील ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे चाचणी विभागाला उपकेंद्राचा भार तपासण्याचे तर क्षेत्रीय कार्यालयांना वीजचोऱ्या पकडण्याचे आदेश अधीक्षक अभियंता दरोली यांनी दिले आहेत.

प्राप्त परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपापल्या परिसरातील रोहित्रांवर अनधिकृत वीज वापर होणार नाही. याची दक्षता परिसरातील अधिकृत कृषीपंपधारकांनी घ्यावी.  जेणेकरून अनधिकृत वीज वापराने भार वाढून रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करता येईल. अनधिकृत वीज वापर करणाऱ्या कृषीपंपधारकांची माहिती तातडीने महावितरणच्या शाखा, उपविभागीय अथवा विभागीय कार्यालयास कळवावी.

तसेच 1800 102 3435/ 1800 233 3435/ 1912 या टोल फ्री क्रमांकावर किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावर माहिती देता येते. विजचोरीची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते व माहिती देणाऱ्यास ठराविक रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते.

अवैध वीजवापराला प्रतिबंध करण्यासाठी महावितरणकडून व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. विविध पथकांची स्थापना करून वीजचोरांवर कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषिपंपासाठी अवैध वीजवापर करू नये तसेच वीजचोरांविरोधातील मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!