जीएसटीमुळे कार विक्री तेजीत

0
नाशिक (वा.प्र.) । वस्तू आणि सेवाकर लागू झाल्यानंंतर नाशिकमध्ये कार विक्रीत लक्षणीय वाढ दिसून आली. जीएसटीमुळे जून महिन्याच्या तुलनेत शहरात कार खरेदीमध्ये तेजी आल्यामुळे चारचाकी वाहन बाजारात नवचैतन्य दिसून आले.

1 जुलैपासून वस्तू आणि सेवाकर प्रणाली लागू झाली. त्यामुळे कार उत्पादक कंंपन्यांनी चारचाकी वाहनांंच्या किमती कमी केल्या. परिणामी वाहने खरेदी करणार्‍या ग्राहकांच्या संंख्येत वाढ दिसून आली. मारुती कंपनीच्या चारचाकी वाहनांच्या विक्रीत जीएसटीनंतर 22 टक्के वाढ झाली.

इतकेच नव्हे तर या कंपनीने आपल्या गुजरातमधील प्लॅन्टमधून डिझायनर कारचे उत्पादन सुरू केले. टोयोटा कंपनीलाही जीएसटीचा फायदा झाला. जून महिन्यात त्यांच्या कार विक्रीत झालेली घट जुलैमध्ये 43 टक्क्यांनी वधारली.

ह्युंदाईच्या कार विक्रीत फार नसली तरी 4 टक्के वाढ झाली. गेल्या महिन्यात जीएसटीनंतर देशभरात 43,007 इतक्या व्हेर्ना सेदान गाड्या विकल्या गेल्या. नाशिकमध्येही जीएसटीचा सकारात्मक परिणाम दिसून आला. जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात ग्राहकांंंमध्ये जीएसटीबद्दल गोंधळ दिसून आला.

त्यामुळे त्यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली. मात्र महिनाअखेर चारचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ दिसून आली. छोट्या गाड्यांच्या किमती कमी झाल्या असल्या तरी अलिशान हायब्रीड गाड्यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे अशा गाड्यांच्या खरेदीचा आलेख मात्र जराही उंंचावला नाही.

जीएसटीमुळे ग्राहक संभ्रमात : जूनच्या तुलनेत जुलैमध्ये जीएसटीमुळे 30 टक्के कार विक्री कमी झाली. ग्राहकांंमध्ये ही करप्रणाली समजून घेताना संभ्रम दिसून आला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलेनत यावर्षी आमच्याकडील चारचाकी वाहनांच्या विक्रीत घट झाली. मात्र याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. ही प्रणाली नक्कीच चांंगली आहे.
                                                                                 – आदित्य बाफना, संचालक, सेवा मोटर्स

ग्राहकांवर प्रभाव नगण्य : जीएसटीमुळे चारचाकी वाहनांच्या किमती कमी झाल्या असल्या तरी आरटीओ कर दोन टक्क्यांनी वाढला. त्यामुळे ऑन रोड गाड्यांच्या किमती फार कमी झाल्या नाहीत. जीएसटी लागू झाला तरीही जुलै महिनाअखेर वाहन खरेदी करण्यास ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली.
– सुधाकर भांगरे, सीओओ, पंचवटी हुंडाई

जीएसटीमुळे वाहन विक्रीत वाढ : जीएसटीमुळे चारचाकी वाहनांच्या 10 हजार ते 2 लाख 40 हजार इतक्या किमती कमी झाल्या. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वाहन विक्रीमध्ये चैतन्य आले. त्यामुळे कार खरेदी करण्यासाठी चौकशी करण्यासोबतच विक्रीतही वाढ झाली. टोयोटाचा मार्कट शेअर वाढला. जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात वाहन विक्रीत लक्षणीय वाढ झाली. बाजारपेठेत आनंदाची लहर आहे.
– सुरेंद्र पुजारी, सीईओ, वासन टोयोटा

भविष्यकाळ चांगला : ही करप्रणाली लागू होऊन केवळ महिनाच उलटला. जीएसटीमुळे चारचाकी वाहन विक्रीत किती वाढ झाली हे आताच सांंगणे जरा कठीण आहे. मात्र नजीकच्या भविष्यात याची चांगली फळे दिसणार आहेत.जीएसटीची चर्चा आधीपासून होतीच. त्यामुळे ग्राहकांची मानसिकताही तयार झाली होती. याचे सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर दिसतील.
– ओेम मोहरीर, संचालक, मोहरीर मर्सडिझ, फोर्ड

 

LEAVE A REPLY

*