श्रीरामपुरात स्वाईन फ्ल्युच्या रुग्णांत वाढ

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरात स्वाईन फ्ल्युचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपरिषद व प्रशासन यांच्या आडमुठे धोरणामुळे तसेच नियोजनशून्यतेमुळे शहरात ऐन पावसाळ्याच्या दिवसात ठराविक ठिकाणीच धूर फवारणी होत असून ती काही ठिकाणी बंद देखील आहे.
त्यामुळे शहरात सर्वत्र डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये लक्षणिय वाढ झाली आहे. त्यातच श्रीरामपूर नगरपरिषदेच्या रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने सदर रुग्णांची हेळसांड होतांना दिसत आहे. रुग्णांचे वेळेवर निदान होत नसल्याने सदर साथीचे आजार संपूर्ण शहरात पसरण्याची भीती आहे. त्यातच स्वाईन फ्ल्युचे संशयीत रुग्ण आढळून आले असून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असून शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला दिसून येतो. परंतु नगरपालिका या प्रश्‍नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना डेंग्यु, गोचिड ताप, कावीळ, मलेरिया, चिकन गुणिया, असे विविध आजार होण्याची शक्यता आहे.
याबाबत प्रशासनाला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे व तथ्यहीन खुलासे करण्यात येत आहे. यामुळे नगरपरिषद व प्रशासन बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*