आयकर भवन झाले ‘वस्तू सेवा कर भवन’

0

कर चुकवेगिरीवर मोठा आळा बसणार : बोरा

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या 15 वर्षांपासून व्यापार्‍यांचा वेळ आणि पैसा कर भरण्यासाठी कागदपत्रे संकलन करण्यात खर्च होत होता. आता सरकारने जीएसटी लागू केल्यामुळे आता सर्वांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. सरकारने आता समान पातळीवर कर लागू केल्यामुळे कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे देश हा महासत्ता होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन उद्योजक अजय बोरा यांनी केले. ‘एक देश, एक कर’ या घोषवाक्यावर आधारित मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी लागू करण्यात आला. शहरातील आयकर भवनचे ‘वस्तू व सेवा कर भवन’ असे नामांतर करण्यात आले आहे.
नामांतराच्या या फलकाचे अनावरण आतिरिक्त आयुक्त ए. वाय. हासे व बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जे. व्ही. पाटील, आर.एच. गिणीर, उंडे बी. व्ही., अनिल पोखार्णा, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, भारताच्या इतिहासात हा दिवस स्मरणीय राहणार आहे. जीएसटी हा नवीन क्रांतिकारी कायदा आला आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाचा फायदा होणार आहे. जीएसटी बाबत सर्व नागरिकांना जागृती करावी लागणार आहे.
जीएसटी भरताना सुरुवातीला अडचणी येतील. मात्र काही कालावधीनंतर ही अडचण दूर होईल. जीएसटीमध्ये सर्व काम हे ऑनलाईन स्वरूपात असल्यामुळे यांचा फायदा सर्वांना होणार आहे. जीएसटीच्या माध्यमातून कर चुकवेगिरीला आळा बसणार असल्याने त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला कर विभागतील सर्व अधिकारी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*