Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची घोषणा

Share

मुंबई | प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस  आणि शासकीय कर्मचारी, अधिकारी  यांच्याबरोबर  एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत त्यांच्या कार्याला  प्रोत्साहन म्हणून त्यांना दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाच्या अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी आज केली.

श्री. परब म्हणाले, दिनांक 23 मार्च पासून पुढील तीन आठवडे संपूर्ण देशात “लॉक-डाऊन” जाहीर करण्यात आले. या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशातील सर्व  व्यवहार बंद झाले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली.

त्यानुसार दि.23 मार्च पासून  मुंबई  व उपनगरातील विविध ठिकाणावरून एसटीच्या  बसेसद्वारे दररोज अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत  आहेत.

दररोज एसटी कर्मचारी चालक, वाहक, यांत्रिकी, सफाई कामगार आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून, अहोरात्र सेवा बजावत आहेत. केवळ मुंबईतीलच नव्हे तर ठाणे, पालघर रायगड अशा विविध विभागातून एसटी कर्मचारी सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कार्यरत आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांचे मुंबईत घर नाही, त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळमार्फत करण्यात आली आहे. तसेच सगळ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जात असताना मास्क व सॅनेटरी लिक्विडची बाटली देण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी एसटी प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री.परब यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!