राज्यातील पहिले ग्रामरक्षकदल राळेगणसिद्धीत

0

ग्रामरक्षकदल सदस्यांची यादी तयार, राळेगणसिद्धी ग्रामसभेत सर्वानुमते निवड

पारनेर (प्रतिनिधी) – राज्यातील पहिल्या ग्रामरक्षकदल स्थापनेची सुरुवात तालुक्यातील राळेगणसिद्धीपासून झाली असून बुधवारी (दि. 7) रोजी झालेल्या ग्रामसभेत 9 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे. तर 15 जून रोजी दल स्थापनेची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात येणार आहे.
राळेगणसिद्धीच्या सरपंच रोहिणी गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे उपस्थित होत्या. ग्रामरक्षक दलासाठी नऊ सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी शेतकरी संपाला पाठिंबा देण्याचा उपसरपंच लाभेश औटी यांनी मांडलेला ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

या सदस्यांची यादी अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे. राज्यात स्थापन होणारे हे पहिले ग्रामरक्षकदल असणार आहे. माजी सरपंच मंगल मापारी यांनी ग्रामरक्षक दलाचे महत्त्व सांगितले.
हजारे म्हणाले, ग्रामरक्षक दलास अनेक अधिकार आहेत.

गावात अवैध धंदे दिसल्यास त्याचा पंचनामा करून पोलिसांना कळविले पाहिजे. ‘ग्रामरक्षक दलाचा कायदा सामाजिक बदल घडविणारा आहे. माहिती अधिकाराप्रमाणे देशातील इतर राज्यांमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाईल’, असे वाटते. सदस्यांनी पदाचा गैरवापर करू नये. तसे आढळल्यास सदस्यत्व काढून घेण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. राळेगणसिद्धी परिवाराने तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी जागृती करावी, असे आवाहन हजारे यांनी केले.

शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 15 जूनच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम रद्द करण्याची मागणी यावेळी ग्रामसभेत करण्यात आली.

राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलातील सदस्य
राळेगणसिद्धी येथील ग्रामसभेत राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलातील सदस्यांची यादी सर्वांनुमते तयार करण्यात आली. यामध्ये हिराबाई नवले, कौशल्या हजारे, माधुरी पठारे, रतन पोटे, शकुंतला औटी, सुरेश राजाराम पठारे, भीमराव पोटे, संदीप पठारे व बाळासाहेब पठारे या नऊ सदस्यांचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

*