बाजार समितीत १५८ क्विंटल शेतमालाची आवक

0
नाशिक | दि. ८ प्रतिनिधी- राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी संपाच्या सुकाणू समितीची बैठक आज नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती. हा संप सुरूच असला तरी गुरुवारी सकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १५८.८० क्विंटल शेतमालाची आवक झाल्याची माहिती बाजार समिती कार्यालयाकडून देण्यात आली. शेतकरी संपामुळे आठवडावर शुकशुकाट असलेल्या बाजार समितीत आज शेतकरी व व्यापार्‍यांनी हजेरी लावली होती.

मागील आठ दिवसांपासून शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, निषेध, प्रतिक्रिया उमटत आहेत. या संपाचे नाशिक केंद्र झाल्यानंतर एक सुकाणू समिती गठित करण्यात आली. या सुकाणू समितीची पहिली राज्यस्तरीय बैठक नाशिकच्या तुपसाखरे लॉन्समध्ये आज झाली. या बैठकीसाठी शेतकर्‍यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.

संपाच्या पार्श्‍वभूमीवर संपाचे केंद्रबिंदू असलेल्या बाजार समितीत मागील सात दिवसांपासून शुकशुकाट होता. बुधवार बाजाराच्या पार्श्‍वभूमीवर ५८ क्विंटल तर गुरुवारी सुमारे १५९ क्विंटल शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत आणण्यात आला. नाशिक शहराच्या अजूबाजूच्या शेतकर्‍यांनी हा माल आणला होता. सुकाणू समितीच्या बैठकीत आज शेतमाल बाजारात आणण्याचा निर्णय झाल्याने शुक्रवारपासून बाजार समितीचा कारभार पूर्ववत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास काही प्रमाणात गजबज दिसली. परंतु दुपारनंतर पुन्हा संपाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीत शुकशुकाट पाहायला मिळाला.

दरम्यान, सुकाणू समितीच्या बैठकीत १२ जूनला तहसील कार्यालयांवर मोर्चा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच १३ जूनला राज्यव्यापी रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे अजून पुढील सहा दिवस संप तसाच राहणार असल्याचे शेतकर्‍यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी तसेच अन्य मागण्यांसाठी संप सुरूच असला तरी शासनाची संस्था म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सुरूच राहणार आहे. शेतमाल बाजार समितीत आल्यास त्या ठिकाणी व्यापारी, अडते, समिती कर्मचारी व्यवहारासाठी तैनात करण्यात आले आहेत.

पोलिसांची गस्त
शेतकरी संपाच्या मगण्या काही पूर्ण होत नाहीत. त्यामुळे पुढील सात ते आठ दिवस संप सुरूच राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ, कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल असा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून बाजार समितीच्या आवारात बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*