जिल्हा रुग्णालयात ९ इन्क्युबेटर दाखल

चार दिवसांत सर्व यंत्रणा होणार कार्यान्वित

0

नाशिक | दि. १ प्रतिनिधी –  नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा इन्क्युबेटरच्या कमतरतेमुळे जीव गेल्याच्या प्रकरणानंतर राज्याच्या आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे. तर आरोग्य मंत्री तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घेत जिल्हा रुग्णालयास १६ इन्क्युबेटर देण्याची घोषणा केली होती. पैकी ९ इन्क्युबेटर दोन दिवसात जिल्हा रूग्णालयास प्राप्त झाले असून ४ दिवसात सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा अतिदक्षता (एनआयसीयु) विभागातील इन्क्युबेटर कक्षाची क्षमता कमी आहे. तर येथे दाखल होणार्‍या बालकांची संख्या त्याच्या दुप्पट आहे. यामुळे क्षमतेपेक्षा अधिक बालकांना यामध्ये ठेवले जाते. परिणामी मागील महिन्यात कमी दिवसांची ५५ नवजात बालके दगावल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी जिल्हा रूग्णालयास भेट दिली होती.पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अखेरीस भेट देऊन शासनाकडून इन्क्युबेटर मिळतील तेव्हा मिळतील परंतु तातडीने विविध कंपन्यांच्या सीएसआरमधून आवश्यक यंत्रणा देण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

अखेरीस पवार यांच्या बारामती ऍग्रो फाऊंडेशनकडून ३ इन्क्युबेटर गुरूवारी उपलब्ध झाले. तर विप्रो कंपनीच्या सीएसआर निधीतून ६ इन्क्युबेटर दाखल झाले आहेत. असे ९ इन्क्युबेटर उपलब्ध झाले असून ४ दिवसांत ही यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी जिल्हा रूग्णालयात १८ इन्क्युबेटर होते. तर उपलब्ध झालेले ९ तसेच पुढे येणारे ७ अशी जिल्हा रुग्णालयात इन्क्युबेटरची संख्या ३४ होणार आहे.

आठवडाभरात ७ इन्क्युबेटर मिळणार
पालकमंत्र्यांनी आश्‍वासन दिल्याप्रमाणे विविध कंपन्यांच्या सीएसआरमधून आपणास आवश्यक असलेले साहित्य येण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसात ९ इन्क्युबेटर उपलब्ध झाले आहेत. यासाठी एनआयसीय विभागातच जागा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधीत तज्ञ लोक यंत्रणा बसविण्यास सुरुवात करत आहेत. पुढील ४ दिवसात सर्व यंत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर पुढील आठवड्यात अधिक ७ इन्क्युबेटर आपणास मिळणार आहेत.
– डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक

LEAVE A REPLY

*