भाजप-सेना मंत्रिमंडळात एकही शेतकर्‍याचं पोर नाही

निफाड येथे हल्लाबोल मोर्चाप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेे यांचे प्रतिपादन

0
निफाड | प्रतिनिधी- ऊस, कापुस, द्राक्षे, कांदा, सोयाबीन, भात पिकविणार्‍या व्यथा आम्ही तीन वर्षांपासून विधिमंडळात मांडतो, त्यावर आंदोलन करतो. मात्र या पिकांचे भाव वाढत नाहीत कारण या सरकारच्या मंत्रीमंडळात एकही शेतकर्‍यांच पोरं नाही. शिवसेना सत्तेचा मेवा खाते आणि सत्ता सोडण्याची भाषा करते. मात्र जनतेला आता फार काळ फसवता येत नाही. नोटबंदी, जी.एस.टी महागाईने शेतकरी, शेतमजूर हैराण झाला आहे. हे सरकार समृद्धी, बुलेट ट्रेनवर खर्च करते. मात्र शेतकर्‍यांना देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाही. शेतकरी ओरड करतो मात्र त्यांना ऐकु येत नाही. सत्तेत गेंडा असेल तर चाबकाने काय फरक पडणार. त्यामुळे शिवसेना, भाजपाची ही राजवट उलथुन टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने हल्लाबोल मोर्चाप्रसंगी निफाड येथील शिवाजी चौकात आयोजित जाहिर सभेत ना. धनंजय मुंढे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, नरहरी झिरवाळ, पंकज भुजबळ, हेमंत टकले, दिपीका चव्हाण, शशिकांत शिंदे, माजी खा.देविदास पिंगळे, चित्रा वाघ, भारती पवार, संग्राम कोतेपाटील, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, मा.आ. दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, युवकचे सचिन पिंगळे, अर्जुन टिळे, नाना महाले, माणिकराव शिंदे, अमृता पवार, सुरेश कमानकर, प्रेरणा बलकवडे, पुरुषोत्तम कडलग, पंढरीनाथ थोरे, अजिंक्य पाटील, नंदन भास्कर, अनिल कुंदे, सुभाष कराड, हरिश्‍चंद्र भवर, अश्‍विनी मोगल, विष्णुपंत म्हैसधुणे, विक्रम रंधवे, देवदत्त कापसे, सागर कुंदे आदी उपस्थित होते.

प्रारंभी झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मा.आ. दिलीप बनकर, अनिल कुंदे यांचे वतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांना चाबुक भेट देण्यात आला. तर दिलीप बनकर यांनी खा. सुप्रिया सुळे यांना तलवार भेट देवुन त्यांचा सत्कार केला. प्रारंभी हल्लाबोल मोर्चाचे शांतीनगर चौफुलीजवळ फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात येवुन बैलगाडीतून नेते सभास्थळी आले. यावेळी बोलतांना धनंजय मुंढे म्हणाले की, आमच्या कार्यकाळात पेट्रोल ५० रु. लिटर अन् डाळ ६० रु. किलो होती. तेव्हा भाजपा मोदीच्या जाहिरातीमधून महागाई दाखवत होते. आता शिवसेना-भाजपाचे सरकार आहे तर पेट्रोल ८१ रु. झाले. रेशनमधून दाळ, साखर, तेल गायब झाली.

आपण घरी म्हशीला मका खाऊ घालायचो. हे सरकार आपल्याला मका खाऊ घालते. आम्ही तीन वर्षापासून संपुर्ण कर्जमाफीची मागणी करतो मात्र सरकार त्याची दखल घेत नाही. शरद पवारांनी संपुर्ण कर्जमाफी केली परंतु एकाही शेतकर्‍याला बँकेच्या दारात येवु दिले नाही, अर्ज भरु दिला नाही. परंतु हे सरकार गेंड्याचे आहे त्याला चाबकाने काही फरक पडणार नाही. सहकार, कारखानदारी कधी मोडेल यावरच हे सरकार काम करीत आहे. शिवसेना फक्त येथे वळवळ करते. त्यांचे आमदार थापाडे असल्याचा टोलाही मुंढे यांनी लगावला. यावेळी खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा जिल्हा शरद पवारांवर प्रेम करणारा आहे. मात्र शेतकरी नवरा नको ग बाई अशी अवस्था आहे. या सरकारला लाज वाटली पाहिजे. आम्हाला वाय फाय नको अन्न पाहिजे.

गरीबी पोटाला आग लावते. डिजिटल इंडिया ला आग लावायची आहे का? पवार कर्तृत्वाने मोठे झाले. त्यांनी कधी जाहिरात नाही केली. भुजबळांनी सर्वांधिक चांगली कामे केली. आताचे सरकार १३०० मराठी शाळा बंद करण्याच्या विचारात आहे. त्यांनी या शाळा बंद केल्या तर एकाही मंत्र्याला घराबाहेर पडू देणार नाही. बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला आदर आहे. ते हयात असते तर त्यांनी अशी लाचारी पत्करली नसती तर सत्तेला लाथ मारुन बाहेर पडले असते. परंतु आजची ही नवी सेना पहा असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले की, हे सरकार जाती-जातीत तेढ निर्माण करीत असुन भाजपाच्या पापाचे शिवसेना वाटेकरी आहे.

या सरकारने सर्वांचा भ्रमनिराश केला आहे. हे सरकार जोपर्यंत संपुर्ण कर्जमाफी करीत नाही तोपर्यंत हल्लाबोल आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे तटकरे म्हणाले. यावेळी दिलीप बनकर म्हणाले की, या सरकारपेक्षा इंग्रज बरे होते. शिवसेनेची अवस्था तर ‘मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली’, ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचुन करमेना’ अशी झाली आहे. या सरकारच्या काळात डांबरी रस्त्यावर मुरुम टाकला जातो. २४ तास विज देण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. मात्र आता विज कनेक्शन कट केले जात आहे. निसाका व रासाका चालु झाला पाहिजे यासाठी पक्षाने ठोस भुमिका शासन दरबारी घ्यावी असे प्रतिपादन बनकर यांनी केले. यावेळी अनिल कुंदे, जितेंद्र आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले तर भेंडाळी येथील प्रेरणा कमानकर या चिमुरडीने बळीराजाची व्यथा मांडली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी सुत्रसंचलन करुन उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी निफाड तालुक्यातील शेतकरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*फटाक्याच्या आतषबाजीत हल्लाबोलचे स्वागत

*शांतीनगर चौफुलीपासून बैलगाडीतून मिरवणूक

*सभेत अबकी बार अंतिम सरकारच्या घोषणा

*प्रेरणा कमानकर हिने मांडली शेतकरी व्यथा

*राष्ट्रवादी नेत्यांना बनकरांकडून चाबूक भेट

LEAVE A REPLY

*