गायरान जमीन घरांचे अतिक्रमण लवकरच नियमित

महिला-बाल रूग्णालयासाठी ९७ पदांसाठी शासनातर्फे मान्यता : राज्यमंत्री भुसे

1
मालेगाव | प्रतिनिधी- ग्रामीण भागातील गायरान जमीनीवरील घरांचे अतिक्रमण कायमस्वरूपी नियमित करण्याच्या धोरणात सुधारणा करत शासन निर्णय राज्यपाल यांच्या आदेशानुसार ग्रामविकास विभागातर्फे १६ फेब्रुवारीरोजी जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे. तसेच सटाणारोडवरील मोसमपुलालगत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रूग्णालयासाठी ९७ पदे शासनाच्या आरोग्य विभागातर्फे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री भुसे यांनी गायरान जमीनीवरील घरांचे अतिक्रमण नियमित करणे तसेच महिला व बाल रूग्णालयासाठी शासनाने मान्यता दिलेल्या ९७ पदाबाबत माहिती दिली. गायरान जमीनीवरील घरांचे अतिक्रमण नियमित करत गोरगरीब जनतेस स्वत:च्या हक्काची घरे मिळवून देण्यासंदर्भात गत अनेक वर्षापासून आपण शासनस्तरावर पाठपुरावा करत होतो. मालेगाव तालुकाच नव्हे तर राज्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमीत घर धारकांना या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या संदर्भात धोरण ठरविण्याचे निर्देश दिले होते. महसुल, नगर विकास, ज्युडिशियल यांचे मार्गदर्शन घेत आपल्या अध्यक्षतेखाली समितीने धोरण ठरवित ते कॅबीनेट मंत्रीमंडळात सादर केले असता त्यास मान्यता देण्यात आली होती.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. शासन निर्णय राज्यपाल यांच्या आदेशानुसार ग्रामविकास विभागातर्फे जाहीर करण्यात आला असल्याचे राज्यमंत्री भुसे यांनी सांगितले. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर समिती गठीत करण्यास शासनातर्फे मंजुरी देण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी उपविभागीय अधिकारी तसेच सचिव म्हणून गटविकास अधिकारी व सदस्य म्हणून तहसिलदार राहणार आहेत. पाचशे ते दोन हजार चौरस फुटापर्यंत जागा नियमित होणार असून पाचशे चौरसफुटाच्या पुढील जागेस दर आकारणी केली जाणार आहे. शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची जलदगतीने अंमलबजावणी करावी या संदर्भात स्पष्ट निर्देश संबंधितांना देण्यात आले असल्याचे राज्यमंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

शहर व तालुक्यातील महिला व बालकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण ठरणार्‍या सटाणारोडवरील शंभर खाटांच्या महिला व बाल रूग्णालयाच्या दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर असून या रूग्णालयासाठी शासनाने वैद्यकिय अधिक्षक, स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ, बालरोगतज्ञ आदी विविध वैद्यकिय अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक, कर्मचारी आदी ९७ पदांना शासनातर्फे मान्यता देण्यात आली आहे. तसेच नर्सिग स्कुलसाठी देखील २६ पदांकरिता मान्यता देण्यात आली आहे. यामुळे महिला-बाल रूग्णालय विविध तज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचार्‍यांनी सुसज्ज होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती भुसे यांनी दिली.

मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बाद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भरविण्यात येणार्‍या मॅग्नेटीक महाराष्ट्र या प्रदर्शनात मालेगाव येथील उद्योगांचे चार स्टॉल लावण्यात येणार आहे. येथील एम.बी. शुगर, एस.पी. टेक्सटाईल्स्, केजल व इन्फ्रा सोलर या चार उद्योजकांचे स्टॉल तेथे लावण्यात येवून माहिती दिली जाणार आहे. या प्रदर्शनात प्रस्तावित पश्‍चिम औद्योगिक वसाहतीवर देखील प्रकाशझोत टाकण्यात येवून उद्योजकांना निमंत्रित केले जाणार असल्याचे राज्यमंत्री भुसे यांनी शेवटी सांगितले. पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख संजय दुसाने, मनोहरबापू बच्छाव, सेना गटनेते निलेश आहेर, माजी पं.स. सभापती केशव पवार, राजेश अलीझाड, अजिंक्य भुसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

1 COMMENT

  1. गायरान जमीन खाजगी उद्योगाला देता येते का??

LEAVE A REPLY

*