Type to search

दिवाळी विशेष - रिपोर्ताज

कृषी पर्यटनाची वाटचाल 

Share

पुण्याला अनेकवेळा येणे व्हायचे पण पुण्याला येऊन सिंहगड किल्ला पाहणे काही व्हायचे नाही . प्रत्येक वेळेला ठरवायचे की यावेळेस पुण्याला गेलो की सिंहगड किल्ला पाहायचाच पण हा ‘ च ‘ काही पाहण्याचा योग आणित नव्हता त्यामुळे ‘ च ‘ जोडूनही उपयोग नव्हता . शेवटी मनात म्हटले , जाऊ दया . जेव्हा आपलं आणि सिंहगडाचं गोत्र जुळून येईल  त्यादिवशी भेटीचा योग येणारच आणि खरोखरच एके दिवशी ध्यानीमनी नसताना माझी लेक म्हणाली,” आज रविवार आहे आपण सर्वजण सिंहगडावर जाऊ या, नाहीतरी घरी बसून काय इडियट बॉक्स समोरच बसणार.

” सिंहगडाचे नाव उच्चारताच जणूकाही सर्वांमध्ये उत्साह संचारला. सर्वांचा उत्साह पाहून मी म्हटले,” अरे, सिंहगडाचे नुसते नाव ऐकताच आपल्यात इतका उत्साह संचारला तर मग तानाजीचा उत्साह किती असेल याची कल्पना येऊ शकते. त्या वीर पुत्रास व खऱ्या देशभक्तास मी मनोमन सलाम करून तयारी करू लागताच आमचे चिरंजीव बरसले आमच्यावर, “हे काही नाशिक नाही फिरायला! सिंहगडावर शनिवारी-रविवारी फिरायला जाणे म्हणजे गाडी पार्क कुठे करायची येथपासून ते परत येताना ट्रॅफिक जॅममधून घरी कसे पोहचायचे याचा विचार करून जा!

सिंहगडावर जायचे तर सकाळी पाच-सहा वाजता निघायचे असते. आता रस्ते इतके वाहत ( गाडयांची गर्दी ) असतील की मुंगीच्या गतीने गाडी पळेल तुमची आणि पप्पाजींच्या पेशन्सची वाट लागेल. “झालं, आता याला मध्ये बोलायची काही गरज होती का! आम्ही बघू ना, कसे जायचे ते,स्वतःला तर आमच्यासोबत यायचे नाही आणि आम्ही जायचे म्हणतो तर ट्रॅफिकचा बागुलबुवा दाखवतो.  मुलाने पुणेकरांच्या शनिवार-रविवारची दैनंदिनी सांगून आम्हांला सतर्क केले होते त्यामुळे आमची मानसिक तयारी चांगलीच झाली होती.

अर्थात पुण्याच्या ट्रॅफिकला घाबरून निर्णय बदलणारे आम्ही नव्हेत! एकदा ठरले म्हणजे ठरले. शेवटी सर्वकाही घाईगडबडीत आवरून आम्हां चौघांची वरात सिंहगडाकडे निघाली. लेक,आम्ही दोघे आणि अकरावीत शिकणारा माझा भाचा असे आम्ही चौघांनी  सिंहगडाकडे प्रयाण केले तेही छत्री, गॉगल,कॅमेरा, पाण्याची बाटली असा आधुनिक सरंजाम घेऊन सकाळी दहा वाजता निघालो.

सिंहगड चार कि. मी. चा माईल स्टोन पाहिला आणि समोरच बॅरिकेटस लावून ट्रॅफिक पोलिस आमच्या स्वागताला हजर! पोलिसांनी गाडी पार्क करून चार कि. मी. पायी जाण्याचा सल्ला दिला आणि चार कि. मी. पायी जायचे नसेल तर दुसऱ्या रस्त्याने जा आणि गड चढून जाण्याची कसरत करा तेवढेच तीन-चार किलो वजन कमी व्हायचे.

अर्थात आम्ही दुसरा पर्याय निवडला कारण वाढलेले वजनही कमी करायचे नि आपले पूर्वज जर चारशे साडे चारशे वर्षांपूर्वी कोणतीही सुविधा नसताना गड चढायचे तर मग आपण आज सुविधा असूनही गड चढू शकत नाही का! असा विचार करून गड चढून जाण्यासाठी मनाची तयारी केली नि गडाच्या पायथ्याशी गाडी पार्क करून बारा वाजता गड चढण्यास सुरवात केली.

निम्मे अंतर चढून झाल्यावर सगळेच दमलेत  नि तहानेने घसाही सुकू लागला नि मग लिंबू सरबत पाहून सगळे ओरडलेत, ‘लिंबू सरबत घेऊ या.’ लिंबू सरबतची ऑर्डर देताच सरबत विक्रेते काका  लिंबू सरबत बनवायला लागले.  लिंबू सरबत बनवतांना त्या  काकांचे  हात मोठ्या सफाईने काम करीत होते, डब्यात हात टाकला नि घेतली मूठभर साखर, दुसऱ्या डब्यात हात टाकला नि घेतले चिमूटभर मीठ आणि ते पाण्याचे मिश्रण वर खाली ओतत असतानाच ते मोठ्याने ओरडलेत, “अरे ए गाढवांनो जरा अक्कल आहे का! माझं सगळं पीक पायाखाली तुडवलंत.” काकांच्या ओरडण्याने आम्ही दचकलोत नि मागे वळून बघतो तर सात-आठ तरूण मुले उतारावर एकमेकाला पकडून सेल्फी काढत होती.

” आम्हीही आश्चर्याने बघितले तर खरंच त्या काकांनी उतारावरच घेवड्याची लागवड केली होती. आम्हांलाही आश्चर्यच  वाटले कारण आम्हांला आमची सपाटीवरची दहा पंधरा एकर शेती पाहण्याची सवय आणि त्या काकांची छोट्याशा जागेत व तेही उतारावर पेरलेले बी पाहून आश्चर्य वाटणारच. काकाच्या ओरडण्यावर ती मुले चांगलीच दचकलीत नि त्या काकांना म्हणालीत, “अहो काका, येथे तर सगळे गवतच आहे.” मी म्हणूनच तुम्हांला गाढव म्हटले, तुम्ही जे ताटात खातात ते कुठून येतं नि कसं येतं ते नाही ठाऊक, तुम्हांला फक्त कागद ( नोटा ) कळतो, काकाने रागाने शिवीही हासडली.

सर्व मुले चांगलीच शरमिंदी झालीत. सरबत विक्रेत्या काकांची बायको काकांना म्हणाली, “अहो, त्या शहरातल्या पोरांना कुठे कळणार, कशाला डाफरलेत त्यांच्यावर!” बायकोच्या या प्रतिक्रियेवर काका चांगलाच भडकला नि बायकोला म्हणाला, “त्यांना खायचं कळतं मग ते खाणं कुठून येतं ते त्यांच्या आईबापांनी नि मास्तरांनी नको का शिकवायला!” असे म्हणतच काकाने आमच्या हातात सरबताचे ग्लास दिलेत नि आम्ही काकाचा तो अवतार बघून विचार करीतच सरबत पिऊ लागलोत. काकाशी शेतीविषयी गप्पा करीतच   प्रत्येकाने दोन दोन ग्लास लिंबू सरबत पोटात रिचवले नि मग स्वतःला ताजतवानं करून गडाची मोहीम फत्ते करण्यासाठी मनाला तयार केले.

गड चढताना काकांचे शब्द डोक्यात चांगलेच धुमाकूळ घालित होती. छोटासा का तुकडा असेना त्यात धान्य पेरून पीक घेणारे गरीब शेतकरी देशाच्या अन्नधान्य पुरवठ्याला नक्कीच हातभार लावतात नि शेती हा देखील जोडधंदा होय हेच त्या काकांच्या कळकळीतून जाणवले आणि शहरातील मुलांसाठी कृषी पर्यटन किती महत्त्वाचे आहे याची जाणीव या घटनेतून जाणवली.

शहरातील प्रत्येक शाळेने पंधरा वीस कि. मी. वरील शेतात मुलांना सहलीसाठी नेऊन तेथील पिकांची माहिती करून द्यावी तसेच प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे सहलीचे आयोजन करावे जेणेकरून शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मिळकत होईल आणि मुलांना अन्नाचे महत्त्वही कळेल तसेच वनस्पती शास्रातील प्रश्नोत्तरे लिहिणे सहज सोपे होईल आणि भूगोल व अर्थशास्र या विषयातील काही भागही समजण्यास मदत होईल याची जाणीव या घटनेमुळे झाली .

सिंहगडावरील पावसाळ्यातील सहल ही सरबतवाल्या काकांमुळे आणि शहरी तरुणांमुळे कायमचीच लक्षात राहिली.

लेखिका

ज्योत्स्ना दिलीप पाटील, भ्रमणध्वनी : ९३२५२३४११८, दूरध्वनी : ( ०२५३ ) २२३२८४७   

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!