Type to search

Featured आवर्जून वाचाच ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : संवाद कौशल्य काळाची गरज

Share

संवाद ही वक्ता होण्याची पहिली पायरी आहे. हाच तुमचा संवाद हृदयसंवादात कधी परिवर्तित होईल हे कुणीही सांगू शकणार नाही. संवाद म्हणजे स्व-कष्टाने विकसित करण्याची कला आहे. विशेष म्हणजे ती साध्य करण्यासाठी वयाची, जातीची, धर्माची अट नाही. फक्त हवी ती माणसाची मनापासूनची तयारी.

अनेक उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ हा उपक्रम राबविला जातो. यानिमित्ताने ‘समाजासाठी युवा शक्ती काही करू शकते…’ हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचविला जातो. यातूनच अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रभावना आपल्या युवकांत आपण जागृत करत असतो. असे अन्य उपक्रम शाळा-कॉलेज मधून राबविले जातात त्यामागे व्यक्तिमत्त्व विकासाला पोषक व्यासपीठ उपलब्ध असते.

काहीजण याचा नक्कीच लाभ घेत असले तरी आजही अनेकजण संवाद कौशल्यात हवी तेवढी प्रगती करत नाहीत हे सत्य आपण नाकारू शकत नाही. आजच्या युगात ‘स्मार्ट’ शब्दाला फार महत्त्व आहे. युवकांना आपल्या मनातील विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी संवाद कौशल्याची गरज असते. संधी आणि जाणीवपूर्वक प्रयत्नातूनच हे कौशल्य आपण विकसित करत असतो आणि त्यासाठी युवा पर्व योग्य ठरते.

संवादामध्ये दोन व्यक्तींचे असणे महत्त्वाचे असते आणि यासाठी बोलणे गरजेचे असते. ह्याला अपवाद दोन प्रेमी जीव. नुसत्या मौनातून अनेक तास बसून राहण्याची किमया त्यांच्याजवळ असते. एक प्रकारे मौन देखील संवादाचा भाग असतो. पण मौनात स्वत:शी संवाद करणे जास्त सोयीस्कर ठरते.

अर्भक आपल्या मातेच्या उदरात राहूनही संवाद साधत असते. अभिमन्यूची कथा सर्वश्रुत आहे. आजच्या काळात गर्भाची इच्छा माता पूर्ण करत असते त्यामागे अव्यक्त संवाद असतोच. लहान बाळ आपल्या मातेने जवळ घेताच शांत राहते.. या स्पर्शाचा संवाद बाळ आणि त्या मातेलाच माहीत असतो.

मिठीत घेणे, हाताने कुरवाळणे, नुसता हात हातात घेणे ह्यातून ममत्व, आपुलकी, धीर या भावना आपण व्यक्त करत असतोच. हा मूक संवादाचा भाग मानवी जीवनात महत्त्वाचा असतो. एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला आपण नुसत्या स्पर्शाने धीर देत असतो पण तो त्याला संकटातून बाहेर यायला पुरेसा ठरतो.. नाही का?

लहान मूल रांगत रांगत एकेक गोष्टी न्याहाळू लागते, नंतर आकर्षणातून हळूहळू शिकू लागते. त्यावेळी आसपासचे प्राणी, वस्तू, रंग आदींतून शिकायचा प्रयत्न करत असते… तोही एक प्रकारचा संवादच असतो. प्राण्यांचे आवाज, वार्‍याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट यातही ते मूल निसर्गाशी संवाद साधत असते. मग भाषेशी त्याचा संबंध येऊ लागतो. सुरुवातीला एकेक शब्द करत.. करत.. बोबडे बोल बोलत.. पूर्ण वाक्य बोलण्यापर्यंत त्याची मजल जाते.

तोपर्यंत शाळेशी त्याचा संपर्क येऊ लागतो. इथे भाषेच्या विश्वात तो रमत जातो. कविता, कथा-गोष्टीतून त्याचे विश्व भरू लागते. मग त्याच्या कानावर विविध कार्यक्रमातून भाषणे पडू लागतात. मग कधीतरी त्याला बोलायची संधी मिळते. संवादाशी हा त्याचा प्रत्यक्ष संबंध असतो. कोणीतरी दिलेले भाषण, उतारा तो घाबरत घाबरत बोलतो. त्याला प्रोत्साहनाच्या टाळ्या मिळतात. एखादा ह्यातून प्रेरणा मिळवितो आणि पुढे क्रमाक्रमाने प्रगती करत संवादात कौशल्य मिळवितो.

बोलण्यात आत्मविश्‍वास हवा

‘संवाद कौशल्य’ आपण प्रयत्नाने मिळवू शकतो हा आत्मविश्वास आपण युवकांमध्ये जागृत केला पाहिजे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन जसे महत्त्वाचे तसे हे कार्यक्रम त्यांच्याकडून सादर केले जातील हेही कटाक्षाने पाहिले पाहिजे.

जसे वृत्तपत्रात लिहिण्यासाठी किंवा ‘वाचकांचे विचार’ लेखक होण्यासाठी जसे खूपच उपयुक्त ठरतात तद्वत कार्यक्रमात सहभागी होऊन प्रथम आभार प्रदर्शन, नंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय, पुष्पगुच्छ देणे, ते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन करण्याइतपत प्रगती करता करता मुख्य भाषण करण्यापर्यंत मजल गाठणे हा संवाद कौशल्याचा परमबिंदू साधता आला पाहिजे. पट्टीचे वक्ते तुम्ही व्हायलाच पाहिजे असे नाही पण आपले म्हणणे दुसर्‍यापर्यंत पोचविण्यामध्ये आपण यशस्वी व्हायला हवे.

मुलाखतीमध्ये नेमक्या ह्याच गोष्टी अभिप्रेत असतात. त्याचा सराव आपण अशाच कार्यक्रमातून करून आत्मविश्वास विकसित करायचा असतो.

आपल्या बोलण्यात नेमकेपणा येऊ लागला की समोरचा माणूस प्रभावित होत असतो. हाच धागा संवादामध्ये महत्त्वाचा ठरतो. संवाद साधण्याची क्रिया ही निरंतर होत असते. आपल्या डोळ्यातून, देहबोलीतून, हावभावांतून आपण ते व्यक्त करत असतो. फक्त त्याला आकार देण्यासाठी आपण सराव केला पाहिजे.

आज संवादाची गरज केवळ मुलाखतच नव्हे तर आपण जिथे काम करत असतो, ज्यांच्या संपर्कात येत असतो, तसेच दैनंदिन व्यवहारात देखील आपल्याला संवाद केल्याशिवाय पर्याय नसतो. आपण संवाद साधताना विचारपूर्वक केला तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो. त्यासाठी गांभीर्याने, जाणीवपूर्वक कष्ट घेण्याची आपली तयारी असायला हवी. सुदैवाने संवाद कौशल्ये शिकविणारी साधने आपल्याजवळ उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व संधी मिळावी

शाळेच्या आरंभी सामूहिक प्रार्थना घेतली जाते. ह्या असेम्ब्लीच्या वेळी विद्यार्थ्यांना संवाद साधण्याच्या सरावासाठी अनेक उपक्रम आपण घेऊ शकतो. श्लोक, सुभाषिते त्याचा अर्थ सांगणे अशा गोष्टी सर्वांनाच शक्य होतील असे नाही पण त्याऐवजी पाठ्यपुस्तकातील एखादी कविता सादर करणे, त्यात हावभावाला संधी असेल तर तशा पद्धतीने सादर करणे. एखाद्या दिवशीचे महत्व सांगण्यासाठी आपण अशा कल्पक सादरीकरणाचा आधार घेऊ शकतो. उदा. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी संजीवनी बोकिलांची…

‘माये गे माये, नको तोडू माझी शाळा
लई लई शिकून म्होठे व्हायचंय मला…’

ह्या कवितेचे सादरीकरण करता येईल. काही वेळा पाठ्यपुस्तकाबाहेरील कवितादेखील सादर करता येईल. आरंभी पाठांतर होत नसेल तर कविता वाचून सादर करायला सांगता येईल. ह्याच प्रकारे दैनंदिन वृत्तपत्रातील एखादी प्रेरणा देणारी बातमी. उदा. एखादा अंध युवक/युवती अभ्यासात चांगले गुण घेऊन दाखवितो/दाखविते.

एखादा ग्रामीण शेतकरी विक्रमी उत्पादन काढून दाखवितो. एखाद्या शाळेत कुठल्यातरी विद्यार्थ्याने एखादा उपक्रम चालविलेला असेल ह्याचे वाचून सादरीकरण शक्य आहे. एखाद्या ज्वलंत विषयावर जसा अंमली पदार्थाचा धोका, कचरा व्यवस्थापन ई. दोन विद्यार्थ्यात संवाद ठेवता येतील. ह्यासाठी आपण स्पर्धाही घेऊ शकतो. वक्तृत्वासाठी जे गुण आवश्यक असतात त्यातले बरेचसे गुण जवळजवळ संवादाला आवश्यक ठरतात. बोलण्यार्‍याच्या नजरेत नजर ठेवून बोलणे, काय?

कुठे? खरेच! अशा शब्दांचा उपयोग बोलण्यात करून बोलणार्‍याला प्रोत्साहन देणे, संवाद प्रभावी करण्यात ऐकणे महत्त्वाची भूमिका पार पाडते. उत्तम संवादात भाषा महत्त्वाची असते. यासाठी आपला शब्दसंग्रह चांगला हवा. त्यासाठी दैनंदिन वाचन उपयुक्त ठरते. या वाचनात वैविध्य असेल तर तुमच्या संवादात विविधता येईल अन्यथा तोचतोचपणा जाणवेल. यामुळे ऐकणारा कंटाळून जाईल. अनेकदा भाषणे कंटाळवाणी होऊ लागतात त्यामध्ये देखील हे एक कारण असते. आसपासची उदाहरणे देऊन त्याचा तुमच्या विषयाशी असलेला संबंध दाखविला गेल्यास आपला संवाद खुमासदार होण्यास मदत होते.

हल्लीच आपल्या महिला क्रिकेट संघातील कर्नाटक राज्यातील एका महिला क्रिकेटियरला महागड्या गाडीची ऑफर त्या राज्यातील सरकारने देऊ केली होती. त्यावेळी तिने मला घराची अडचण आहे ती दूर केल्यास जास्त चांगले असे म्हणून ती ऑफर नाकारली होती. या उदाहरणातून आपण स्थानिक प्रश्‍न किती महत्वाचे आहेत हे विषद करू शकतो. आपला संवाद प्रभावी होण्यासाठी चर्चात्मक कार्यक्रमात भाग घ्यायला विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे विविध विषयाचे ज्ञान त्याला होईलच शिवाय आपला मुद्दा पुढे कसा मांडावा… याचीही त्याला कल्पना येईल. टी.व्ही. वाहिन्यांवर अशा कार्यक्रमांना खूपच मागणी आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजीत असे बरेच कार्यक्रम एखादा दैनंदिन गाजलेला विषय घेऊन त्यावर अशी चर्चा घडविली जाते. विशेष म्हणजे यात दोन्ही पक्षाचे वक्ते सहभागी होत असतात. संवादात आवाज महत्त्वाचा असतो. आपला आवाज अगदी पट्टीच्या नटाच्या तोडीचा नसला तरी निदान समोरच्या व्यक्तींना व्यवस्थित ऐकू जावा इतपत असायला हवा. आपले उच्चार स्पष्ट हवेत. समयसूचकता हवी. सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा.

यापुढे तुमच्या रिपोर्टकार्डावर असलेल्या गुणांपेक्षा तुम्ही तुम्हांला माहीत असलेल्या माहितीला शब्दरूप कसे देता… यावर तुमची पहिली छाप पडणार आहे. यासाठी शालेय जीवनातच अशा उपक्रमात भाग घेण्याची संधी तुम्ही सोडू नये. शाळा ही एक प्रयोगशाळा आहे. इथे तुम्ही केलेल्या प्रयोगाला कुणी हसणार नाही तर प्रोत्साहनच देतील. त्याचा जास्तीत जास्त लाभ घेणे आपल्या हाती आहे. रोजच्या वर्तमानपत्रात विविधता असते.

त्यातूनच हे प्रयोग करायला सुरुवात करा. अवांतर वाचनात आलेल्या उत्तम कविता- त्यांच्या ओळी, एखादा आकर्षक मथळा लिहून ठेवा, पाठ करा, इंटरनेट वापरत असाल तर तिथे अनेक विषयांची मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतील व्याख्याने तुमची वाट बघत आहेत. ती शक्य असेल तर लिहून काढा, त्याची पारायणे करा. नजीक एखादे व्याख्यान, चर्चात्मक कार्यक्रम असेल तर त्याचाही आस्वाद घ्या. त्याचा शालेय कार्यक्रमातून उपयोग करायचा प्रयत्न करा. त्यातून तुमचा संवाद खुलू लागेल, फुलू लागेल आणि एक दिवस तुम्हांलाच तुमचा संवाद प्रभावी झाल्याचे जाणवेल.

मित्रांनो, एक लक्षात घ्या… संवाद ही वक्ता होण्याची पहिली पायरी आहे. हाच तुमचा संवाद हृदयसंवादात कधी परिवर्तित होईल हे कुणीही सांगू शकणार नाही. संवाद म्हणजे स्व-कष्टाने विकसित करण्याची कला आहे. विशेष म्हणजे ती साध्य करण्यासाठी वयाची, जातीची, धर्माची अट नाही. फक्त हवी ती माणसाची मनापासूनची तयारी. आपला देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. ७१ व्या वर्षात पदार्पण करताना आपल्याकडून आपल्या या महान देशाची अशीही सेवा करू शकतो.

मृणाल पाटील, बी.वाय.के.कॉलेज

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!