Type to search

Featured फिचर्स संपादकीय

हवामान बदलाचे परिणाम

Share

पर्यावरण संरक्षण हा केवळ चर्चेचा विषय राहिला नसून प्रदूषण रोखण्यासाठी झपाट्याने पावले उचलणे आवश्यक आहे. सजीवसृष्टीच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. जगातील आपत्तींच्या भयावह तांडवातून हे स्पष्ट होत आहे.

ओंकार काळे

वातावरणातील बदलांचे दृश्य परिणाम आता जगभर जाणवू लागले असून त्यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट होत चालले आहे. जंगलांना लागणार्‍या वणव्यांमध्ये होत असलेली वाढ, उष्णतेच्या लाटा, महापूर, भूकंपांचे धक्के आणि ज्वालामुखींचे उद्रेक, विविध चक्रीवादळांचे तडाखे, समुद्रात उसळणार्‍या अवाढव्य उंचीच्या लाटा आणि प्राणी-पक्षी यांच्या संख्येत होत चाललेली घट या सगळ्याला प्रदूषण कारणीभूत आहे, ही बाब आता मान्य करावी लागत आहे. याला आणखी एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून दुजोरा मिळाला आहे.

हिंदू कुश हिमालयाच्या परिसरातल्या चार देशांमधल्या तेरा गावांमध्ये वाढत्या प्रमाणात पाणी असुरक्षिततेला तोंड द्यावे लागत आहे. ‘वॉटर’ या जर्नलमध्ये हा अभ्यास अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. या गावांमध्ये भारतातल्या पाच गावांचा समावेश आहे. मसुरी, देवप्रयाग, कॅलिम्पाँग, दार्जिलिंग आणि सिंगटम ही ती पाच गावे होत. प्रचंड पाणी उपलब्ध असलेल्या ऐन हिमालयीन प्रदेशातल्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणे ही भीषण घटना मानली जात असून यामागे हिमालयाचा शहरी भाग कोरडा पडत जाणे, हे कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘मॅपिंग चॅलेंजेस फॉर अ‍ॅडप्टिव्ह वॉटर मॅनेजमेंट इन हिमालयन टाऊन्स’ असे या अभ्यासाच्या अहवालाचे शीर्षक असून अंजल प्रकाश हे या अहवालाचे एक संपादक आहेत. शिवाय आयपीसीसीच्या ओशन अ‍ॅण्ड क्रायोस्फिअर या अभ्यासाचे ते प्रमुख लेखकही आहेत. त्यांच्या मते,
सिमल्यासह हिमालयातल्या आणि इतर डोंगराळ भागातल्या सर्वच गावांना हे निकष सारख्याच
प्रमाणात लागू होतात. काठमांडूतल्या इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन
डेव्हलपमेंट (आयसीआयएमओडी)तर्फे हा अभ्यास हाती घेण्यात आला.

आयसीआयएमओडी हे आंतरसरकारी मंडळ असून या मंडळाचे सदस्य असलेल्या आणि हिमालयाचा प्रदेश असलेल्या आठ देशांसाठी काम करते. भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान हे ते आठ देश होत. पाण्याची उपलब्धता, पाणीपुरवठा यंत्रणा आणि झपाट्याने होणारे शहरीकरण तसेच पाण्याच्या दैनंदिन तसेच मोसमी मागणीत सातत्याने होणारी वाढ यांच्यातला अन्योन्य संबंध या अभ्यासातून समोर आला आहे.

पाण्याच्या मागणीतल्या वाढीला लोकसंख्यावाढीबरोबरच या भागात येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत होत असलेली वाढही कारणीभूत आहे. हिमालयाच्या परिसरातल्या सुमारे तीन चतुर्थांश शहरी भागातली लोकसंख्या 50 ते 100 टक्के पाणीपुरवठ्यासाठी झर्‍यांवर अवलंबून आहे. या अभ्यासानुसार 2050 पर्यंत पाण्याची मागणी आणि पुरवठा यातील तफावत दुपटीने वाढेल.

या अभ्यासात पाण्याची मागणी आणि पुरवठ्यातली तफावत, उपलब्ध जलस्रोत आणि वातावरणातल्या बदलांची आव्हाने या घटकांचे प्रामुख्याने विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार या अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, या संपूर्ण परिसरातील झरे, तळी, सरोवरे, कालवे आणि नद्या यांसारख्या जलस्रोतांची अवनती होत असून पाणी वाहून नेणारे दगडी मार्ग, विहिरी आणि पाण्याच्या स्थानिक टाक्या यांसारख्या पारंपरिक पाणी यंत्रणांमधले पाणी झपाट्याने ओसरत चालल्याचे
दिसत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!