Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअवकाळी नुकसानीचे तात्काळ पंचनामे : कृषीमंत्री भुसे

अवकाळी नुकसानीचे तात्काळ पंचनामे : कृषीमंत्री भुसे

अंबासन । वार्ताहर

गारांच्या वर्षावासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे राज्यात अनेक भागात शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बागलाण तालुक्यात देखील गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांची हानी झाल्याचे दिसून येत आहे. या नुकसानीचे यंत्रणेस तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच कॅबीनेट बैठकीसमोर ठेवण्यात येवून आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी या दृष्टीकोनातून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

- Advertisement -

बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे काल झालेल्या गारपिटीसह बेमोसमी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी भेट देत केली. यावेळी आपद्ग्रस्त शेतकर्‍यांचे सांत्वन करतांना कृषिमंत्री भुसेंनी त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन देत दिलासा दिला. यावेळी आ. दिलीप बोरसे, लालचंद सोनवणे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

गुरूवारी सायंकाळी झालेल्या बेमोसमी पावसासह गारांच्या तडाख्याने गहू, हरभरा, भुईमूग, कांदा आदी पिकांची तसेच द्राक्ष व डाळींब बागांची अतोनात हानी झाली आहे. काढलेला व काढणीवर आलेल्या गहू व कांद्याचे पिक गारांच्या तडाख्याने अक्षरश: उध्वस्त झाल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू तराळले आहेत. बेमोसमीमुळे तब्बल तीन वेळा कांद्याचे बियाणे व तेही पाच हजार रूपये किलो दराने विकत घेत शेतकर्‍यांनी रोपे तयार केली होती व चांगल्या भावामुळे नुकसान भरून निघेल या आशेने कांद्याची लागवड केली गेली.

मात्र पिक अंतीम टप्प्यात असतांनाच आलेल्या बेमोसमी पावसामुळे कांद्याची पुर्णत: वाताहत झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अंबासन, अंतापूरसह ताहाराबाद, पिंगळवाडे, करंजाड आदी भागात बेमोसमी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. या नुकसानी संदर्भात आ. दिलीप बोरसे यांनी कृषिमंत्री भुसे यांना माहिती देताच त्यांनी आज तातडीने अंतापूरला भेट देत नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे कृषि व महसूल यंत्रणेने तात्काळ पुर्ण करत शासनाकडे सादर करावेत यात कुठलीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सुचना आ. बोरसे यांनी यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या