आजारी असतानाही उपायुक्तांची कार्यतत्परता; भर पावसात वाहतूककोंडी सोडवत वाहनांवर कारवाई

0
नाशिक । वेळ सायंकाळी सहाची, टिळकवाडी सिग्नलपासून सावरकर जलतरण तलावाकडे जाणार्‍या मार्गावर घरी जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी, अशातच रोडच्या दुतर्फा कशाही पार्क केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी झालेली, याच मार्गावरून आजारी असल्याने रुग्णालयात जात असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने ही गर्दी पाहिली.

त्याने आपले वाहन बाजूला उभे करून खाली धाव घेतली आणि अंगरक्षक पोलीस कर्मचार्‍याच्या मदतीने स्वतः वाहतूक कोंडी सोडवत चारचाकी वाहनांवर कारवाई सुरू केल्याचा प्रकार आज नाशिककरांना पहावयास मिळाला.
परिमंडळ 1 व शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी भर पावसात ही कारवाई केली.

आजारी असल्याने ते साध्या गणवेशात रुग्णालयात जात होते. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सुट्टीच्या वेळेमध्ये टिळकवाडी सिग्नल ते सावकर तरण तलाव रोडवर वाहतूक कोंडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आजूबाजूला कशाही पार्क केलेल्या चारचाकी वाहनांमुळे यामध्ये अधिक भर पडली होती.

पदाचा कसलाही विचार न करता तेसच आजारी असल्याची तमा न बाळगता त्यांनी आपले वाहन बाजूला उभे करत खाली धाव घेतली. प्रथम वाहतूककोंडी दूर करण्यासाठी स्वतः पुढे सरसावत वाहनांना दिशादर्शन केले. तोपर्यंत अंगरक्षक कर्मचार्‍याने तातडीने वाहतूक विभागाच्या अधिकार्‍यांना कॉल करत जादा कुमक मागवून घेतली.

काही वेळातच दाखल झालेल्या कर्मचार्‍यांनी पाटील यांच्या सूचनेनुसार रोडच्या कडेच्या वाहनांना जॅमर लावत कारवाई सुरू केली. आडवी वाहने उभी करणार्‍या चारचाकी वाहनचालकांवर विविध कलमाअंतर्गत कारवाईचा बडगा उगारत मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आला.

ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु भरपावसात साध्या गणवेशात असलेल्या अधिकार्‍यांने पदाचा मिथ्या अभिमान न बाळगता कार्यतत्परता दाखवत सर्वसामान्य कर्मचार्‍याप्रमाणे त्यांच्या सोबतीने रस्त्यावर उतरून केलेल्या कारवाईचे बहूतांशी नाशिककरांनी स्वागतच केल्याचे चित्र होते.

LEAVE A REPLY

*