देवळाली कॅम्पात इम्पोर्टेड मद्य पकडले; दोघांना पोलीस कोठडी

0

देशदूत डिजिटल

नाशिक | राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत महागड्या विदेशी मद्याचा साठा देवळाली कॅम्प परिसरातून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, ११ सप्टेंबर रोजी द्वारका परिसरात नरेश पेरूमल नागपाल यास शहरातील द्वारका परिसरात महागड्या मद्याची वाहतूक करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता मद्य देवळाली कॅम्प येथील किरणपाल फत्तेचंद नागपाल याच्याकडून आणल्याचे त्याने सांगितले.

त्यानुसार देवळाली कॅम्प येथील किरणपाल याच्या घरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. तेव्हा, त्याच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनात एक लिटरच्या ११० स्कॉच मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मद्याची एकूण किंमत जवळपास साडेनऊ लाख रुपये आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कर चुकवून हे मद्य आणल्याचे त्यांनी सांगितले. महागडे मद्य आणून ते शहरातील उच्चभ्रू व्यक्तींना स्वस्त दरात विक्री करत असल्याचे समोरे येत आहे. तसेच मद्य खरोखर कर चुकवून आणले की, बनावट आहे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग तपास करत आहे.

या प्रकरणातील दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयात उभे केल्यानंतर दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथक क्रमांक एकचे पोलीस निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अरुण सुत्रावे, वीरेंद्र वाघ, सुनील पाटील, विलास कुवर, विष्णू सानप, पूनम भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक संतोष चोपडेकर, सीपी निकम, दुय्यम निरीक्षक संजय ताकवाले, पांडुरंग कुडवे, योगेश साळवे व साक्षी महाजन यांचाही या पथकात समावेश होते. पुढील कारवाई   दुय्यम निरीक्षक  प्रवीण मंडलिक करत आहेत.

LEAVE A REPLY

*