पार्ट्यांतून पैसा कमवण्याचा ‘स्मार्ट पॅटर्न’;  नाशिकच्या सौंदर्याला बाधा

0
नाशिक । (खंडू जगताप) | सौंदर्यसृष्टीने नटलेल्या नाशिक व परिसराला मुंबई तसेच शहरातीलही आंबटशौकीनांची नजर लागत आहे. धार्मिक नगरी अशी ओळख असलेल्या जिल्ह्याच्या या परिसरात डान्सबार, रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करून नंगानाच केला जात आहे.

या पार्ट्यांचे आयोजन करून यातून लाखो रुपये कमवण्याची नवीन आघाडी आता काही नाशिककरांनी घेतल्याचे दिसत आहे. परंतु यातून निर्माण होणारे नैतिक्तेचे व पुढील पिढीला बरबाद करणार्‍या प्रश्नांवर वेळीच उपाय योजनांची गरज आहे.

नाशिकचे नंदनवन म्हटले जाणार्‍या इगतपुरी परिसरातील हॉटेल रेन फॉरेस्ट येथे मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून 8 पुरुष व त्यांच्यासह 7 मुली. यामध्ये काही अल्पवयीन आहेत. त्यांना ताब्यात घेतले. या ठिकाणी हे सर्वजण दारू पिऊन डान्सबारमध्ये अर्धनग्न अवस्थेत बीभत्स नृत्य करताा आढळून आले.

यामधील बहुतेक जण मुंबईचे बडेबाप के बेटे तसेच आंंबट शौकीन आहेत. त्यांच्यावर रीतसर डान्सबार बंदी, पोस्को असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याच परिसरात सहा महिन्यांपूर्वी 27 मार्च 2017 ला याच भागात मिस्टीक व्हॅली या हॉटेल परिसरातील 11 नंबरच्या एका बंगल्यावर आयोजित करण्यात आलेल्या अशाच पार्टीवर इगतपुरी पोलिसांनीच धाड टाकून 3 बारबालांसह 9 मुलांना अटक करण्यात आली होती. हे सर्व सनदी अधिकारी व मोठ्या बिल्डरांची मुले होती. हे सर्व दारूच्या नशेत तर्रर्र होऊन बारबालांसोबत बीभस्त नृत्य करत गोंधळ घालत होते.

तर दोन महिन्यांपूर्वीच 9 ऑगस्टला 2017 त्र्यंबकेश्वरजवळ पाच हॉटेल्सवर केलेल्या कारवाईदरम्यान चक्क 46 महाविद्यालयीन मुले, मुली ग्रामीण पोलिसांच्या हाती लागली होती. यात 23 मुलांचा आणि तितक्याच मुलींचा सहभाग होता. अगदी 16 ते 20 वर्षांपर्यंतची ही मुले नाशिक शहरातील वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये शिक्षण घेतात. मुलांचे पुढील भवितव्य लक्षात घेत पोलिसांनी समज देऊन सोडून दिले.

या सर्व प्रकारांमध्ये एकच समान धागा आहे . तो म्हणजे अशा पार्ट्यांचे आयोजन करणारे नाशिकमधील आहेत. नाशिक शहरात उच्चभ्रू क्षेत्रात वेश्या व्यवसाय चालवणे, ऑनलाईन पद्धतीने हा व्यवसाय पसरवणेे, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या पुरवणे, असे विविध प्रकार सर्रास चालू आहेत.

यामध्ये आता या नव्या प्रकारांची भर पडत आहे. आंंबट शौकीन व पैसेवाल्यांची मुले हेरून त्यांना आकर्षित करायचे व त्यांना सोशल माध्यमांद्वारे एकत्र करून त्यांच्या रंगारंग डान्स बार पार्ट्यांचे आयोजन करायचे असे उद्योग काही मंडळींनी सुरू केले असून याद्वारे लाखो रुपयांचे अर्थाजन केले जात आहे. यासाठी अनेक साखळ्या कार्यरत आहेत.

नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इंगतपुरी यासह एकंदर जिल्ह्याचे धार्मिक महत्त्व देशभरात ओळखले जाते. यासह या परिसराला लाभलेल्या सौंदर्यसृष्टीने राज्यातील पर्यटनाचा हा भाग मोठा आधार मानला जातो.

पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयी-सुविधा या भागांमध्ये उभ्या आहेत, तसेच त्यात वाढ केली जाते आहे. हे चित्र समाधानकारक दिसत असले तरी त्याआड अनैतिकतेचा मोठा बाजार भरवला जातो आहे. धनदांडग्यांच्या मुलांच्या डान्सबार तसेच रेव्ह पार्ट्यांकडे वेगळ्या दृष्टिने पाहिले जाईल.

परंतु यामध्ये एकाच वेळी महाविद्यालयातील 46 मुले व मुली सापडणे, ही बाब धक्कादायक असून, सर्वांना विचार करण्यास भाग पाडणारी आहे. या औट घटकेच्या आनंदात मुला-मुलींचे भावविश्व व संपूूर्ण भविष्यच धोक्यात येऊ शकते हे समजून घेणे गरजेचे आहे. अशा अनैतिक कृत्यांंना रोखण्यासाठी सर्वच स्तरातून अधिक जोमाने प्रयत्न होण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*