Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : अपुऱ्या कर्मचारी अभावी वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

Share

इगतपुरी । इगतपुरी तालुक्यात आदीवासी समाजाचे सर्वात जास्त वास्तव्य आहे. अनेक गावे, वाड्या पाड्यावर जंगल भागात या समाजाचा वावर जास्त प्रमाणात आहे. आजही हा समाज शहरापासुन लांब राहात असल्याने यांना आरोग्याची चांगली सेवा मिळावी म्हणुन यासाठी शासनाने अनेक ठीकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. मात्र वरीष्ठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व या केंद्रामध्ये अपुऱ्या कर्मचारीं अभावी ही आरोग्य केंद्रे शोभेच्या वास्तु बनत चालल्या आहेत.

तालुक्यातील वैतरणा भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्थाही अशीच झाली आहे. या भागात सर्वात जास्त आदीवासी ठाकर, कातकरी समाजाचे वास्तव्य आहे. या क्षेत्रात वैतरणा धरणाची निर्मिती केल्यामुळे अनेक शेतकरी भुमीहीन झाले. उर्वरीत आदीवासी बांधवांना आरोग्याची सेवा मिळावी यासाठी शासनाने वैतरणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. या बरोबरचं आहुर्ली, कोरपगाांव, वाळविहीर, क-होळे, नागोसली या ठीकाणी आरोग्य उपकेंद्राची निर्मिती केली.

पुर्वी वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉक्टर, सहायक डॉक्टर्स, आरोग्य सहायक, कनिष्ठ सहायक, आरोग्य सेविका, परिचारीका, शिपाई असा सुसज्ज २३ कर्मचारीचा वावर होता. यामुळे या आरोग्य केंद्राचा या दुर्गम भागातील वाड्या पाड्यातील जनतेला लाभ मिळत होता. मात्र सद्य स्थितीत या ठीकाणी ही जबाबदारी पेलण्यासाठी एकच डॉक्टर व अपुरे कर्मचारी उपलब्ध असल्याने ही वास्तु शोभेची बनत चालली आहे.

या केंद्रातील काही कर्मचारी निवृत्त झाल्यावर उर्वरीत जागा भरल्या गेल्या नाहीत. येथील कर्मचारीची बदली झाल्यावर त्या ठीकाणी नवीन कर्मचारी भरले गेले नाहीत. तसेच आहुर्ली, कोरपगाव, वाळविहीर, क-होळे, नागोसली या उपकेंद्रात प्रत्येकी दोन कर्मचारीची नियुक्ति केल्याने वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारींची संख्या अपुरी पडत आहे. तर बाह्यरुग्ण तपासणीसाठीही डॉक्टरची ही जागा रिक्त असल्या कारणाने रुग्णांची हेळसांड होत आहे.

तर एकच डॉक्टर कुटुंब कल्याण शस्त्रक्रीयेसाठी चार ते पाच ठीकाणच्या उपकेंद्र व पेठ भाागात जात असल्याने ऐनवेळी धारगांव केंद्रात आलेल्या अति महत्वाच्या रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. खोकल्यासाठी, खाज खरूज उपचारावर मलम, डोळ्याची औषधि येथे उपलब्ध होत नाही. तसेच विजनिर्मिती केंद्र येथुन हाकेच्या अंतरावर असतानाही महीण्याकाठी पंधरा दिवस विद्युत पुरवठा वारंवार बंद राहतो. त्यातच ऑनलाइन कामाकाजासाठी नेट नसल्याने येथील संगणकही धूळखात पडुन आहे.

त्यातच आदीवासी दुर्गम भागात डॉक्टरांसह कर्मचारीही येथे येण्यास व रुजु होण्यास इच्छुक नसल्याने प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. कर्मचारीसाठी बांधण्यात आलेली घरांची स्थिती तर अतिशय दयनिय झाली आहे. तर गेल्या वर्षाभरापासुन ही आरोग्य केंद्राची इमारत निर्लखित केली असुन याकडे शासन व लोकप्रतिनिधीने त्वरीत लक्ष देवुन उर्वरीत कर्मचारींच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात अशी मागणी येथील स्थानिक नागरीक करत आहे.

शासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त असलेल्या जागा त्वरीत भरण्यात याव्यात या मागणीसाठी पाठपुरावा करणार असुन शासनाने आदीवासी जनतेची हेळसांड करू नये. अन्यथा तिव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल.
– पांडुरंग खातळे, सरपंच, क-होळे

कुटुंब कल्याण शस्त्रक्रीयेसाठी आठवड्यातुन तीन दिवस पेठ भागातील आरोग्य केंद्रात जावे लागत असल्याने या काळात इतर डॉक्टरांची व्यवस्था प्रशासाने करावी.
– डॉ. बुधा लचके, वैतरणा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!