इगतपुरीतील १४ कोटींचा रस्ता वर्षभरातच गेला खड्ड्यात

0

इगतपुरी ता. २९ (विशेष प्रतिनिधी) : शहरात दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या जुना मुंबई आग्रा महामार्गावर एकाच वर्षात खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे.

खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली न बांधल्याने हा प्रकार होत आहे. संबंधित ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दोन वर्षांपूर्वी सुमारे १४.५० कोटी रुपये खर्च करून इगतपुरी शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जुना मुंबई आग्रा महामार्गाचे महिंद्रा कंपनी ते बोरटेंभे असे जवळपास ५ कि.मी .सिमेंट काँक्रीटीकरण व एक कि. मीचे डांबरीकरण करण्यात आले.

यात महिंद्रा कंपनी ते गिरणारे काँक्रीटीकरण, तर गिरणारे ते बोरटेंभे फाटा असे डांबरीकरण करण्यात आले. मात्र हा रस्ता बांधताना नाल्यांचा विचार न झाल्याने आज इगतपुरी वासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

शरातील हा रस्ता शासकीय कार्यालय , पोलीस ठाणे , रेल्वे स्थानक , ग्रामिण रूग्णालय , न्यायालय , तसेच शाळा , महाविद्यालय ,आदि ठिकाणी जाण्याचा मुख्य मार्ग आसल्याने सदर रस्ताच खडडामय झाल्याने नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.

गेली दोन वर्षापासून शहरातील त्रस्त नागरिक तहसिलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना रस्त्याबाबत निवेदने देत आहेत, पण अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

रस्ता दुरूस्ती झाली नाही तर ठेकेदार , सार्वजनिक बांधकाम अभियंता , संबंधित अधिकाऱ्यांच्या तोडांला काळे फासू आणि तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करून जनतेची शक्ती दाखवू असा इशारा एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्थानिक युवकांनी दिला आहे.  महेश शिरोळे यांच्या नेतृत्वा खाली स्वातंत्र दिनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचे स्थानिक युवक म्हणाले.

रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांविषयी आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाणी बाबत वेळोवेळी संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील ते दुर्लक्ष करत आहे. ठेकेदारावर बांधकाम खात्याचा अंकुश नसल्याने हा प्रकार होत आहे. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तेव्हाच त्याला नागरिकांच्या भावना समजतील.
– महेश शिरोळे,
सामाजिक कार्यकर्ते, इगतपुरी

आम्ही संबंधित ठेकेदाराला गत वर्षी देखील याविषयी पत्र दिले होते. ठेकेदाराची डिपॉझिट आमच्याकडे आहे त्याने सुधारणा करून दिली नाही तर त्याच्या डिपॉझिट मधून सार्वजनिक बांधकाम खाते हे काम करून घेईल जेथे पाणी साचते तेथे तात्काळ दुरुस्तीचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.
– श्री पाटील अभियंता सा बां विभाग
रस्त्यावर पाणी साचत असल्याने दुचाकी घेऊन जाताना अडचणी येत आहे. पाणी भरलेले खडडे चुकविण्यासाठी गेलो असता एकदा तोल जाऊन पडलो. मोटर सायकल पडून दोन अपघातात युवक दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर साचलेले पाणी मोठी समस्या आहे. आणखी किती बळी घेणार. अधिकारी, ठेकेदारांच्या आर्थिक फायद्यासाठी जनतेने त्रास का सहन करायचा?

–  अँड . मुन्ना पवार, भाजपा शहराध्यक्ष , इगतपुरी.

LEAVE A REPLY

*