Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : ८९ गावांतील गावठाण जमिनींची होणार ड्रोनद्वारे मोजणी

Share

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महसुली गावांपैकी ८९ गावांच्या गावठाण जमिनींची ड्रोनद्वारे मोजणी करण्यांत येणार आहे. या मोजणी मुळे नकाशा तसेच मालकी हक्काचा अभिलेख म्हणून मिळकत पत्रिका मिळणार आहे. यासाठी अचूक व जलदगतीने मोजणी करण्यासाठी प्रथमच अत्याधुनिक ड्रोन वापरला जाणार आहे.

यासाठी इगतपुरीच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचा भाग म्हणून १० गावांची प्रायोगिक तत्वावर गावठाण सीमेची मोजणी करून निश्चित करण्यांत आली आहे.

शासनाकडून ‘ड्रोनद्वारे गावठाण भूमापन’ हा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यात लवकरच ही मोजणी करण्यात येणार आहे. ड्रोनद्वारे एका दिवसात 2 ते 3 गावठाणांची मोजणी करणे शक्य होणार आहे. ड्रोनद्वारे गावठाण भूमापन हा महत्वाकांक्षी जनताभिमुख प्रकल्प असून त्याद्वारे गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाआधारे सर्वेक्षण होईल. यातून गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होऊन जमीनधारकांना आपल्या मिळकतींच्या सीमा, नेमके क्षेत्र माहित होणार आहे.

जमिनीच्या मोजणीचे काम करण्याच्या पद्धतीबाबत भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. यापुर्वी फक्त २००० लोकसंख्येवरील गावे गावठाण भूमापनासाठी घेण्याची तरतुद होती. मात्र शासनाने मार्चमध्ये अधिसूचना काढून भूमापन झाले नसलेल्या गावठाणांची मोजणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत व महानगरपालिका तसेच यापुर्वी मोजणी झालेल्या गावठाणचे क्षेत्र वगळण्यात आले आहे. यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडून ड्रोनची साथ मिळाली.

त्यामुळे गावठाणे निश्‍चित करण्याचे धोरण या विभागाने अवलंबले आहे. गावठाण मोजणीमुळे ग्रामीण पातळीवरील अर्थ व्यवस्थेत तरलता निर्माण होणार आहे. ग्रामविकासाच्या उपयोगी योजना राबविण्यास मदत होणार आहे. गावठाणातील व गावठाणालगत अतिक्रमण आढळण्यास मदत होणार आहे.

ड्रोन कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रे घेऊन प्रत्यक्षात जमिनीची मोजणी केली जाणार असून राज्यात असा पहिलाच प्रयोग करण्यात येत आहे. यासाठी ड्रोन कॅमेरा ऑपरेट करणारा कर्मचारी, दिशा ठरविणारा सर्व्हेअर आणि मोजणी केल्यानंतर मालकी अधिकाराचा निर्णय देणारा अधिकारी या सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या कॅमेर्‍याद्वारे जमिनीच्या क्षेत्राची मोजणी, त्या क्षेत्राच्या चतु:सिमा निश्‍चित केल्या जाणार आहेत. ‘ड्रोनद्वारे गावठाण भूमापन’ हा प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत तालुका पातळीवर उप अधीक्षक भूमी अभिलेख, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, गाव तलाठी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

‘ड्रोनद्वारे गावठाण भूमापन’ हा प्रकल्प इगतपुरी तालुक्यात राबवण्यासाठी नियोजन सुरू आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांत निर्माण होणारे तंटे रोखण्यासाठी मदत होईल. अनेक वर्षानंतर मोजणी होत असल्याने गावठाणातील खाजगी व सरकारी जमीनीची स्थिती अचूकतेने समोर येईल. लवकरच मोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल यासाठी नागरीकांनी वेळावेळी ग्रामसभेला आणि मोजणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.
– दत्ता वाघ, उप अधीक्षक भूमी अभिलेख इगतपुरी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!