उच्च शिक्षित आदिवासी जोडप्याचा आदर्श; पारंपरिक पद्धतीने झाला आदिम लगीन सोहळा

पुणे, नंदुरबार, धुळे, ठाणे, नगर जिल्ह्यातून आदिवासींची उपस्थिती

0
सुरगाणा ((वाजिद शेख) | ते आले अन् सव्वा रुपया देज (हुंडा) देत त्यांचा साखरपुडा (बोलपेन )अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पार पडला.या कार्यक्रमाकरीता बारा ते पंधरा जणांची उपस्थिती होती.

आदिवासींमध्ये पुर्वीच्या काळी जन्म संस्कार केले जात असत त्यामध्ये चोरी न करणे, खोटे न बोलणे, फसवणूक न करणे, पोलिस ठाणे व कोर्टाची पायरी न चढणे , वृद्ध माता पित्यांचा सांभाळ करणे, लगीन सोहळ्यात हुंडा न घेणे उलट पक्षी नवरीलाच धान्याच्या रुपात देज देणे ,पंचाच्या मदतीने गावातला तंटा गावातच मिटविणे, विवाहात पती पत्नीचे सुत न जमल्यास काडीमोड घेणे, थोरा मोठ्यांना आदरभाव ठेवणे , निसर्गाची पुजाअर्चा करणे असे अनेक जन्मापासून दिलेले संस्कार आज आदिवासी समाज विसरत चालला आहे.

त्या ख-या संस्कृतिला उजाळा व चालना देण्यासाठी हा लगीन सोहळा पार पडला आहे. आदिवासी समाजात हुंडा दिला अगर घेतला जात नाही. लगीनची बोलणी बोलपेनने केली जाते. लग्नातील वाटाघाटी करण्यासाठी जे कारभारी बोलविण्यात येतात व लग्न ठरवितात त्यास बोल खाणे असे म्हटले जाते.

यावेळी मुलगी पसंत झाल्यावर बोलपेन कार्यक्रमाच्या वेळी अवघा सव्वा रुपया देज (दहेज ) मुलीच्या वडीलांना सुपूर्द करुन बोलपेन म्हणजे लग्नाचा ठराव पक्का केला जातो.

लग्नाच्या वेळी नवरा मुलाने सव्वामन धान्य (सोळा पायली) देजच्या रुपात देणे कायदयाने बंधनकारक आहे. या दिलेल्या धान्याला” घाण” असे संबोधले जाते.

यामध्ये पाच प्रकारचे धान्य दिले जाते,भात, नागली, उडीद, तुर, वरई आदि.त्यानंतर गावकरी पंचाचा कायदा गावरितीप्रमाणे एकवीस, एकावन्न, एकशे एक या स्वरूपात घेतला जातो.

यात आईवडिलांनी,नातेवाईकांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करणे नवर मुलाला सक्तीचे असते. यावेळी वडिलधा-यांचा मान ठेवला जातो. बोलपेनच्या वेळी नवरा मुलाला नारळ(झग्या) , करगोटा, टाॅवल, टोपीचा मान दिला जातो, नवरीला साडी चोळी दिली जाते.

या लग्नाला कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता पारंपारिक पद्धतीने आदिम धर्मसोहळा प्रमाणे विवाह पार पडला आहे.  कमी खर्चात लग्न झाले आहे, लग्नातील मंगलाष्टके आदिम रितीने भगत राजाराम चौरे, कवी रमेश भोये यांनी म्हटली आहेत. डीजे, बॅजो या वाद्यांना फाटा देऊन कहाळया, मादोळ, तुर हि वाद्य वाजवली.

आज पर्यत आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने कळवण, इगतपुरी, नवापूर, सुरगाणा , अकोला, राजुर या भागात आदिम लगीन सोहळे पार पडले आहेत.याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आदिवासी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागूल, किसन ठाकरे,पंकज ठाकरे, राम चौरे, कवी रमेश भोये, कृष्णा गावित, शुभम राऊत, अॅड. दत्तू पाडवी, अॅड. दत्तू पाडवी, तज्ञ मार्गदर्शक रविंद्र तळपे, चेतन खंबायत, डॉ. मुरलीधर वाघेरे, आदि प्रयत्नशील आहेत.

यावेळी अशोक बागुल म्हणाले ” आदिवासी समाज बांधवांनी आपल्या संस्कृती प्रमाणे लगीन सोहळ्याचे आयोजन करावे. हुंडा देणे व घेणे हया प्रथा समाजात अस्तित्वात नाहीत.आदिवासी संस्कृतिवर पाश्चात्य संस्कृतिचे आक्रमण होत आहे हे निंदनीय आहे.समाजात स्त्रिभृण हत्या होत नाही.

अलीकडे थाटामाटात होणारे लग्न सोहळे ,त्यावर होणारी पैशाची वारेमाप उधळपट्टी ह्यामुळे कर्जबाजारी होत असलेला सामान्य शेतकरी व अखेर होत असलेल्या आत्महत्या ह्या सर्व बाबींना पूर्णविराम देत सुरगाणा तालुक्यातील कै. प्रभाकर खंबाईत .ह्यांची कन्या हेमलता व कृष्णा घुटे,पेठ तालुक्यातील पिंपळपाडा येथील सेवानिवृत्त शिक्षक ह्यांचे चिरंजीव विजय ह्यांचा आदिम विवाह सोहळा आदिवासी निसर्ग पूजक संस्कृती जोपासत राणा लान्स ,दिंडोरी रोड म्हसरूळ येथे पार पडला.

लगीन सोहळा वैशिष्टेपुर्ण होता.यावेळी आदिवासी क्रांतिवीरांचे प्रतिमा पुजन करण्यात आले.कणसरी माता , झाड निसर्ग देवता, धरती मातेची पुजा मांडवात मांडली होती.

लग्नासाठी मुलगी पाहायला गेल्यावर फक्त पाच पंचासमोर सव्वा रुपया भरून पेन. झगा नारळ,साखरपुडा वै.खर्चिक कार्यक्रम न करता साधे कुकू-मांगने कार्यक्रम कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण अथवा हुंडा नाही.कार्यक्रमात बँड अथवा डीजे नाही ,त्याऐवजी पारंपारिक आदिवासी वाद्य, ढोल, पावरी,संबळ, कहाळयाचा वापर त्यामुळे ध्वनी प्रदूषण नाही.

लगीन सोहळ्यात धान्याच्या अक्षता न वापरता निसर्ग पूजक म्हणून फुलांचा वापर.मंगलाष्टकाऐवजी मांडव मंत्राचा घोष.

अशा एक ना अनेक वैविधतेने हा लगीन सोहळा पार पडला ,या सोहळ्यास किसन ठाकरे, अशोक बागुल,हरिश्चंद्र भोये, देवा वाटाणे, एस.के. चौधरी ,रतन चौधरी, प्रभाकर महाले,सुरगाणा शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, कृष्णा गावित, अॅड. दत्तू पाडवी, शुभम राऊत,आदिसह जिल्ह्यातील सर्व आदिवासी चळवतील कार्यकर्त्या बरोबरच शहादा,नंदुरबार ,नवापूर,साक्री, आंबेगाव व विदर्भातूनही समाजप्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*