डुबेरे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा आदर्श; ५ विद्यार्थी दत्तक घेतले

0
डुबेरे | गरजू व गरीब होतकरु विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडावा या उदात्त हेतूने माजी विद्यार्थ्याने पुढाकार घेत मित्राच्या मदतीने विद्यालयातील ५ गरजु विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी १ लाख ५ हजार रुपयांचा धनादेश आज (दि.१८) पतसंस्थेत डिपॉजिट करुन समाजापूढे एक आदर्श निर्माण केला आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित डुबेरे येथील जनता विद्यालयाचा माजी विद्यार्थी संदेश भगवान वाजे हा तरुण आज जर्मनीतील एका मोठ्या कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.
ज्या गावात वाढलो, ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी, समाजासाठी काही तरी करावे असा विचार संदेशच्या मनात नेहमीच घोळत होता.
कशी मदत करता येईल यासाठी अनेक मित्रांशी त्याने चर्चाही केली. शेवटी विद्यालयातील गरीब व गरजु असे  पाच विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च करायचा असा निश्‍चिय संदेशने केला.
त्यांच्या मनातील संकल्पना त्याने दिल्लीस्थित धिरज मक्कर या मित्रालाही त्याने सांगितली. मित्रालाही संदेशची संकल्पना आवडली. मग आपणही मदत करण्यासाठी तयार असल्याचे सांगत मित्रानेही ३० हजार रुपये संदेशकडे सुपूर्द केले.
आज (दि.१८) श्रीमंत थोरले बाजीराव पेशवेंच्या ३१७ व्या जयंतीनिमित्त पेशवे पतसंस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात संदेशने १ लाख ५ हजार रुपयांचा धनादेश फिक्स डिपॉजिट करण्यासाठी श्रीमंत पतसंस्थेचे चेअरमन नारायणशेठ वाजे यांच्याकडे सुपूर्द केला.
या ठेवीच्या व्याजातून विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या-पुस्तके, वर्षभरासाठी लागणारी शैक्षणिक फी देखील भरण्यात येणार आहे. संदेशने पुढाकार घेऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने गरीब व होतकरु  विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडणार असून समाजातील इतर तरुणांसाठी संदेशचा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा आशावाद नारायणशेठ वाजे यांनी व्यक्त केला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मदत करून संदेश व त्याच्या दिल्लीस्थित मित्र धिरज मक्कर यांनी समाजात एक चांगला पायंडा घालून दिल्याचे व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे म्हणाले. प्राचार्य एस. सी. रहाटळ यांनी संदेश व त्याच्या मित्राचे या आदर्शवत उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी सेवानिवृत्त नायब तहसिलदार दत्ता वायचळे, भगवान वाजे, संस्थेचे कार्यकारी संचालक भिमराव चव्हाण, अय्युब शेख, दिलीप गवारे, महेंद्र डावरे, रामकृष्ण माळी, किशोर माळी, राजेंद्र माळी, सूर्यभान ढोली, दशरथ गुरव व पेशवे मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*