Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशभारतातील वटवाघळांमध्ये आढळला ‘बॅट कोरोना’

भारतातील वटवाघळांमध्ये आढळला ‘बॅट कोरोना’

 सार्वमत

नवी दिल्ली – भारतातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये संशोधकांना एक घातक ठरणारा विषाणू आढळला आहे. त्याला ‘बॅट कोरोना’असे नाव देण्यात आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधकांंनी हा विषाणू शोधला. या विषाणूचा कोरोनाच्या कोविड-19 या विषाणूशी कोणताही संबंध नाही. कोविड-19 विषाणू अस्तित्वातच नव्हता तेव्हापासून 2018-19 पासून यावर अभ्यास सुरू होता.

- Advertisement -

आयसीएमआरने वटवाघळाच्या ट्रोपस आणि राऊस्टस या दोन प्रजातींवर अभ्यास केला. ट्रोपस वटवाघळाचे नमुने केरळ, कर्नाटक, चंदीगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, तेलंगण आणि तामिळनाडूतून घेण्यात आले आहेत. ट्रोपसचे 508 पैकी 21, तर राऊस्टसचे 78 पैकी 4 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात केरळ, हिमाचल, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या राज्यांतील नमुनेच पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आयसीएमआरच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, सध्या भारतात वटवाघळाच्या दोन प्रजातींमध्ये हा व्हायरस सापडला असून यावर सखोल अभ्यासाची गरज आहे. जेणेकरून भविष्यातील मोठ्या महामारीचा यातून अगोदरच इशारा देता येईल. तसेच, यावर उपाययोजनाही शोधता येतील.

यातील एक अभ्यासक पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक डॉ. प्रज्ञा यादव म्हणाल्या, वटवाघळांमधील या विषाणूमुळे मानवाला संसर्ग होतो, याचे पुरावे आढळलेले नाहीत. या नव्या अभ्यासातून वटवाघळांबद्दल अगदीच नकारात्मक वातावरण निर्माण होऊ नये, हे पण पाहिले पाहिजे. परिसंस्थेसाठी (इको सिस्टिम) वटवाघळे अत्यंत महत्त्वाची आहेत. यापूर्वी रॅबिज, हेन्ड्रा, मारबर्ग, निपाह, इबोलासारखे घातक विषाणू वटवाघळात सापडले आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे. चीनमध्येही कोरोना विषाणू प्रथम वटवाघळातच आढळला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या