हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांना फाशी एकास जन्मठेप

0

हैद्राबाद : २००७ साली येथील गोकुळ चाट आणि लुंबिनी पार्क येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणाचा अंतिम निकाल समोर आला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने तिघा दोषींपैकी दोघांना फाशी तर अन्य एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इस्माईल चौधरी आणि अनिक शफिक सईद ही फाशीची शिक्षा ठोठविण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी तारीक अंजुमला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

एनआयएच्या विशेष न्यायालयाने तारीक अंजूम यालाही दोषी ठरविले होते. त्याच्यावर बॉम्बस्फोटानंतर मुख्य आरोपींना आश्रय देण्याचा आरोप होता.

याप्रकरणी ५ आरोपीना तेलंगणा पोलिस गुप्तचर विभागाने अटक केली होती. यातील संशयित फारुक शराफुद्दीन तरकीश आणि मोहम्मद सादिक इस्सर अहमद शेख यांची ४ सप्टेंबरला न्यायाधीश टी. श्रीनिवास राव यांनी निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. यावर्षी जूनमध्ये चेरालपल्ली मध्यवर्ती कारागृहाच्या आवारातील हॉलमध्ये याची पुढील सुनावणी करण्यात आली.

२००७ साली २५ ऑगस्ट रोजी हैद्राबाद स्थित लुंबिनी उद्यानात पहिला बॉम्बस्फोट तर दुसरा गोकूळ चाट भांडार या प्रसिद्ध हॉटेलमध्ये झाला होता. या घटनेत आणखी २ बॉम्ब शहराच्या इतर भागात आढळले होते. त्यामध्ये ४२ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ५४ लोक जखमी झाले होते.

या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने ४ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये अनिक शफिक सईद, मोहम्मद सादिक, अकबर इस्माईल चौधरी आणि अन्सार अहमद बादशाह शेख यांचा समावेश आहे. हे आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेशी संबंधित आहे.

LEAVE A REPLY

*