पत्नीच्या आत्महत्येला पतीची प्रेयसी जबाबदार नाही- हायकोर्ट

0
भोपाळ : पत्नीच्या आत्महत्येसाठी पतीच्या प्रेयसीला जबाबदार मानता येणार नाही, असा निर्णय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. एका प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तीन वर्षांपूर्वी हे प्रकरण झालं होतं. आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध होते, केवळ एवढ्या कारणावरून कोणत्याही महिलेविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असे मत कोर्टानं सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे.

तीन वर्षांपूर्वी कथिरित्या घरगुती छळाला कंटाळून 14 डिसेंबर 2015 रोजी अविनाश सिंह या व्यक्तीच्या पत्नीनं आत्महत्या केली होती. एका महिलेसोबत माझ्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि या कारणामुळे पतीकडून माझा छळ होत होता, अशी माहिती पीडित महिलेनं पोलिसांना मृत्यूपूर्वी दिली होती. पीडितेच्या जबाबानंतर तिच्या पतीसहीत प्रेयसीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या दोघांविरोधात कलम 304 (सदोष मनुष्य वध) आणि 498-अ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते. कोर्टाच्या आदेशाविरोधात पतीच्या प्रेयसीनं जबलपूर हायकोर्टात आव्हान दिले.

हे प्रकरण सत्र न्यायालयातून उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायमूर्ती अंजुलि पालो यांनी प्रेयसीवरील आरोप हटवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, सदर महिलेचे फिर्यादी महिलेच्या नवऱ्यासोबत संबंध असतील किंवा नाही, हा वेगळा मुद्दा आहे. जर हे संबंध आहेत असं आपण मानून चाललो तरीही ही महिला त्यांच्या घरी राहून तिला हुंड्यासाठी छळ करत असेल, असं गृहित धरता येणार नाही. फक्त तिचे पीडितेच्या नवऱ्याशी विवाहबाह्य संबंध असणं हा आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा सबळ पुरावा होऊ शकत नाहीत, असा निर्वाळा देत महिलेवरील सर्व आरोप न्यायालयाने फेटाळून लावले.

LEAVE A REPLY

*