पाठिंब्यासाठी कुकाणा परिसरातील गावांमध्ये स्वयंस्फूर्त बंद

0

श्रीरामपूर-परळी रेल्वेमार्गासाठी उपोषण पाचव्या दिवशीही सुरु; ग्रामस्थ संतप्त; रस्त्यावर उतरण्याची तयारी

कुकाणा (वार्ताहर)- श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गांच्या पूर्णत्वासाठी कुकाणा येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुकाण्यासह परिसरातील गावांमध्ये बंद पाळून उपोषणास उत्स्फूर्त पाठिंबा देण्यात आला. उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर जागेवरच सलाईन व अन्य वैद्यकीय उपचार करण्यात आले.
कुकाणा परिसरातील गावांनी काल बंद पाळून उपोषणाला पाठिंबा दिला. सकाळपासून सायंकाळपर्यंत ग्रामस्थांनी उपोषणस्थळी गर्दी केली होती.
उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार मुंबई विभागीय प्रबंधक स्वतःउपोषणस्थळी आले नाही तर कुकाणा व परिसरातील ग्रामस्थ तसेच विविध संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाचव्या दिवसांपर्यंत रेल्वे विभागाच्या अहमदनगर येथील अहमदनगर रेल्वे विभागाचे अभियंता पंढरीनाथ पैठणकर तसेच सेक्शन इंजीनियर विद्याधर धांदोरे आदी अधिकार्‍यांनी भेट दिली. परंतु सक्षम लेखी आश्‍वासन देवू न शकल्याने उपोषणकर्त्यांचे समाधान झाले नाही.
त्यामुळे आज बुधवारी सहाव्या दिवशीही उपोषण सुरुच राहणार आहे. मंगळवारपासून पोलीस प्रशासन गाव बंद मुळे फौजफाट्यासह तैनात आहेत तर मंगळवारी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले भेटीप्रसंगी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, श्रीरामपूर-परळी रेल्वेमार्ग हा नेवासा-शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी गरजेचा आहे.आपलाही त्यास पुर्णपणे पाठिंबा आहे.
येथील उपोषणाची केंद्रसरकारने त्वरित दखल घेऊन जबाबदार अधिका-र्‍यांनी या रेल्वेमार्गाबाबतची सद्यस्थिती लोकांसमोर मांडावी.उपोषणकर्त्यांच्या जिवीताशी खेळू नये. यावेळी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, अजित मंडलिक, समर्पण फौंडेशनचे डॉ. करण घुले, प्रभारी तहसिलदार प्रदीप पाठक सर्कल दरंदले, कामगार तलाठी बड़े, काकासाहेब शिंदे, भैय्यासाहेब देशमुख, राजेंद्र म्हस्के, बबनराव पिसोटे आदी उपस्थित होते.
नेवासा व शेवगाव तालुक्यातील कुकाणा, तरवडी, भायगाव, जेऊरहैबती, चिलेखनवाडी, भेंडा बुद्रुक, सुकळी, देवगाव, गोंडेगाव, म्हसले, देवसडे, तेलकुडगाव, सोनइर, पाथरवाले या ग्रामपंचायतींसह संत सेना महाराज ग्रुप कुकाणा, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शेतकरी संघटना, पंचायत समिती सभापती, उपसभापती, भाजपा, प्रहार जनशक्ति पक्ष, समर्पण फौंडेशन, पेन्शनर असोसिएशंन, मेडिकल असोसिएशन, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी डॉक्टर सेल, महाराष्ट्र लहूजी सेना आदी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी उपोषणाला पाठिंबा असल्याचे पत्र दिले.

LEAVE A REPLY

*