प्रकृती खालावलेल्या उपोषणार्थींवर जागेवरच वैद्यकीय उपचार : आज परिसरातील गावांमध्ये बंद

0

श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गासाठी उपोषणाचा चौथा दिवस

कुकाणा (वार्ताहर)- कुकाणा येथे श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गासाठी सुरू करण्यात आलेले उपोषण कालच्या चौथ्या दिवशीही सुरूच होते. कालही अधिकार्‍यांनी भेट देऊन चर्चा केली, मात्र समाधान होऊ शकले नाही. दरम्यान उपोषणार्थींची तब्यत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचार घेण्याचे सुचविण्यात आले. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार करण्यात आले.
काल उपोषणस्थळी अहमदनगर रेल्वे बांधकाम विभागाचे सुधांशू कुमार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. उपोषणकर्त्यांना वैद्यकीय विभागाने उपोषणस्थळी उपचार चालू केले. रुग्णालयामध्ये उपचार घेण्यास नकार दिल्याने जागेवरच उपचार देण्यात आले.
या प्रश्‍नी जबाबदार् अधिकारी आले नसल्याने उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार मुंबई विभागीय प्रबंधकांशी चर्चा करूनच उपोषण सोडणार असल्याचे उपोषणकर्त्ते रितेश भंडारी , कारभारी गरड, महेश पुंड, निसार सय्यद, प्रकाश देशमुख, सुरेश नरवणे यांनी सांगितले.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंगळवार 5 डिसेंबर रोजी कुकाणासह परिसरातील चिलेखनवाडी, वडुले, तेलकुडगाव, अंतरवाली, तरवडी, पाथरवाला, सुकळी, नांदूर शिकारी, जेऊर हैबती, शेवगाव तालुक्यातील भायगाव आदी गावांतील सर्व दुकाने बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने उपोषणास पाठिंबा देत आहेत.
या उपोषणस्थळी माजी आमदार संभाजीराव फाटके यांनी भेट देऊन सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख, उपसभापती राजनंदिनी मंडलिक, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, युवा नेते अजित मंडलिक, दत्तात्रय खाटीक आदींसह नेवासा शेवगाव या तालुक्यातील बहुतांश गावांच्या सरपंचांनी जाहीर पाठिंबा देण्यासाठी ग्रामपंचायतचे ठराव दिले. तसेच अनेक सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला.

 

 

 

LEAVE A REPLY

*