नाशिक जिल्ह्यात वर्षभरात दहा बिबट्यांचा मृत्यू; 80 बिबट्यांचा वावर; पाच वर्षांत वाढले 20

0
नाशिक । आपल्या चपळाईने सर्वांना परिचित असलेल्या बिबट्याचे वनक्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे तो उसाच्या शेतात आपला रहिवास शोधत आहे. वनविभागच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात सध्या 80 तर नगर जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त बिबटे आहेत. नागरी वस्तीत बिबटे आल्याने अपघातात त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. नाशिकमध्ये आजवर असे 10 तर नगरमध्ये 20 बिबटे मृत्युमुखी पडले आहेत.

मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील महिन्यात तीन घटनांनी नाशिक जिल्हा हादरला. त्यात शहराच्या अगदी लगत असलेल्या मेरी-म्हसरूळ परिसरातही बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यामुळे जंगलातून बिबट्या आता नागरी वस्तीकडे कूच करीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

उसात सहज लपता येत असल्यामुळे तो उसाला पसंती देतो. ऊस कापणीच्या वेळी अनेकदा शेतात बिबट्याची पिल्ले आढळल्याच्या घटना नाशिक आणि नगर जिल्ह्यात घडल्या आहेत. उसाच्या क्षेत्रामुळे नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांत सर्वाधिक बिबटे फिरत असतात, असे वनविभागाचे म्हणणे आहे. माणसाचा वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रातील अतिहस्तक्षेप वेळीच न थांबल्यास येत्या काही वर्षांत बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

निफाड, सिन्नर परिसरत सर्वाधिक बिबटे : उसाचे सर्वाधिक क्षेत्र तसेच पाण्याची उपलब्धता यामुळे निफाड आणि सिन्नर तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. याशिवाय नगरमधील अकोला, संगमनेर, कोपरगाव, राहुरी आणि पारनेर या भागात बिबट्यांचे प्रमाण अधिक आहे. एकावेळी बिबट्याला चार पिल्ले होतात. सर्वसाधारणपणे त्यातील दोन पिल्ले जगतात. यामुळे बिबट्यांच्या संख्येत नाशिक आणि नगरमध्ये वाढ होत आहे.

शॉक, रस्ता अपघातात मृत्यू : वर्षभरात नाशिक आणि नगरमध्ये अपघातात 32 बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यात विशेषत: विहिरीत पडून, रस्त्यावर वाहनाची धडक लागून, विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. यशिवाय हद्दीच्या वादातूनही त्यांच्यात मृत्यू होतात. नगरमध्ये हद्दीच्या वादावरून दोन बिबट्यांत काही महिन्यांपूर्वी जोरदार मारामारी झाली. त्यात एका बिबट्याचा मृत्यू झाला.

माणिकडोह केंद्रात उपचार : जखमी अवस्थेत बिबट्या आढळल्यास त्याला जुन्नर परिसरातील माणिकडोह निवारा केंद्रात उपचारासाठी दाखल केले जाते. परंतु जास्त वेळ तेथे ठेवल्याने त्याचा आक्रमकपण राहत नाही. तसेच तो परावलंबी होत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

अन्नाच्या शोधात बिबट्या लोकवस्तीत : निसर्गरम्य परिसराची भुरळ पडल्याने फार्म हाऊसच्या नावाखाली नाशिकच्या लोकांच्या जंगलात वस्त्या वाढू लागल्या. जमीन सपाटीकरणासाठी जेसीबीचा होणारा वापरही वाढला आहे. रस्त्यांच्या सोयीमुळे वीकएन्डनिमित्त वाहने या भागात घिरट्या घालू लागली. विरळ जंगल आणि विशेषत: डोंगर कपार्‍यांत या बिबट्यांच्या अधिवास क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने त्याने वैयक्तिक सुरक्षा व अन्नाच्या शोधात जवळच्या नागरी वस्त्यांना आपले लक्ष्य केले.

बालकांचे बळी अधिक : बिबट्यांच्या खाद्यामध्ये जास्त वैविध्य असते. प्रांतानुसार बिबट्यांच्या खाद्यामध्ये बदल होतो. सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी. पण ते माकडे, उंदरांसारखे कृतक प्राणी, सरीस्रुप, उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात.

कधी कधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीसुद्धा खातात. सुरक्षितता मोठ्या माणसांना माहीत असल्याने बिबट्याच्या हल्ल्यातून धडधाकट माणसे वाचताना दिसतात. मात्र बालकांना बिबट्या जवळ आला तरीही त्याची भयावहता समजत नसल्याने ते बळी पडतात. दुसरीकडे वृद्धांमध्ये प्रतिकार करण्याची क्षमता कमी असल्याने तेदेखील बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडतात.

वनविभागास सहकार्याची गरज : बिबट्या नजरेस पडल्यास किंवा त्याला पकडण्याबाबत केलेल्या कारवाईची माहिती मिळाल्यास लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अशावेळी काम करताना अडचणी येतात. नागरिकांनी सहकार्य केल्यास बिबट्याला पकडणे सोपे होऊ शकते.
– एस. व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक

वनविभाग कायम सतर्क : बिबट्याला पकडण्याचा शेवटचा पर्याय म्हणून ट्रँक्युलायझिंग गनचा वापर केला जातो. वनविभागाच्या पाच विभागांकडे प्रत्येकी एक गन आहे. शिवाय ती चालवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आहेत. रेस्क्यू व्हॅनसह पिंजरा, तंबू, जाळी, दोर, दुर्बिण, सर्चलाईट, फोल्डिंग टेबल, बॅटरी आदी साहित्यदेखील नेहमीच तयार असते. घडणार्‍या घटनांना तोंड देण्यासाठी वनविभाग तयार असतो.
– व्ही. टी. घुले, विभागीय वनअधिकारी

LEAVE A REPLY

*