Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्र‘हुनर हाट’ हे भारताचे प्रतिकात्मक स्वरुप

‘हुनर हाट’ हे भारताचे प्रतिकात्मक स्वरुप

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयोजित ‘हुनर हाट’ प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि. २२ : ‘हुनर हाट’ हे भारताचे प्रतिकात्मक स्वरुपच आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एम एम आर डी ए मैदानावर भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयोजित ‘हुनर हाट’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे सचिव पी. के. दास, आणि केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी  राज्यपाल यांनी प्रदर्शनाची पाहणी केली.

राज्यपाल म्हणाले, ‘हुनर हाट’ या भारत सरकारच्या उपक्रमामुळे छोट्या घटकातील कलाकारांना वाव मिळून त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. मार्केट आणि संधी उपलब्ध झाल्याने या कलाकारांना आर्थिक नफा मिळत आहे. हे कलाकार भारताची परंपरा अबाधित ठेवतात आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची शिकवण देतात, भारत सरकारच्या योजना अशा घटकांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. या प्रदर्शनाचा वाढता प्रतिसाद पाहता प्रदर्शनाचे आणखी दोन दिवस वाढवावे लागतील.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारा आयोजित ‘हुनर हाट’ दस्तकार, शिल्पकारांसाठी ‘एम्पॉवरमेन्ट- एम्प्लॉयमेंट एक्सचेंज’ म्हणून सिद्ध होत आहे. दस्तकार शिल्पकारांना बाजारपेठ देण्यासाठी देशाच्या विविध भागात आयोजित ‘हुनर हाट’ प्रामाणिक आणि विश्वसनीय ब्रँड बनला आहे.

‘हुनर हाट’मध्ये अवधी खाना, राजस्थानी दाल बाटी चुरमा, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन व्यंजन, केरळी मलबार फूड, तामिळ व्यंजन, बंगाली मिठाई, सुगंधी पान, ओडिसी सिल्व्हर फिलीग्री उत्पादन, जम्मू काश्मीरची प्रसिद्ध विलो बैट या विशेष खाद्यपदार्थांचा समावेश आहे. प्रदर्शन कालावधीत कव्वाली, सुफी संगीत, नृत्य यांसह अन्य सांस्कृतिक कार्यक्रम ‘हुनर हाट’चे आकर्षण ठरणार आहे.

हे प्रदर्शन दि.२० ते ३१ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सुरु राहणार असून यामध्ये देशभरातील विविध ठिकाणचे कारागीर, दस्तकार, शिल्पकार सहभागी होणार आहेत. हुनर हाटचे यंदाचे १६ वे वर्ष आहे.

प्रदर्शनाबाबत : दि. २० ते ३१ डिसेंबर पर्यंत सदर ‘हुनर हाट’ एमएमआरडीए मैदान, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असणार आहे. प्रदर्शनात देशाच्या विविध भागातील दस्तकार, शिल्पकार, खानसामे सहभागी होणार असून यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग असेल.

या प्रदर्शनात भारतातील अमूल्य कारागिरीचा उत्तम नमुना असलेले झारखंड सिल्कच्या व्हेरायटी, भागलपुरी सिल्क आणि लिनन, लाख वापरून तयार केलेले पारंपरिक दागिने, पश्चिम बंगालचा काथा, वाराणसी सिल्क, लखनवी चिकन करी, उत्तर प्रदेशचे सिरॅमिक, टेराकोट्टा, काचेच्या वस्तू, पितळी भांडी, चामडे, संगमरवरी वस्तू, आंध्र प्रदेशातील कलमकारी, मंगलगिरी आणि मोत्यांचे दागिने, गुजरातचे अजरख, तांब्याच्या घंट्या, पतियाळाची फुलकारी आणि जुत्ती, मध्य प्रदेशचा बाटिक, बाघ, चंदेरी, महेश्वरी, जम्मू काश्मीरमधील होम फर्निशिंग, तांब्याची भांडी आणि हँडलूम, राजस्थानी स्वदेशी हँडिक्राफ्ट आणि हँडलूम पाहण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या