Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्ह्यात ईद निमित्ताने माणुसकीचे दर्शन

Share

मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी प्रार्थना अन् वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत

अहमदनगर (प्रतिनिधी) – देशात व राज्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून अल्लाहने सर्वांची रक्षा करावी जिवीतहानी व आर्थिक नुकसान टळावे, सर्व जाती – धर्मात सलोखा राहुन राष्ट्रीय एकात्मता वाढून देशात शांतता नांदावी, सुबत्ता व्हावी अशी सामुदायीक प्रार्थना काल सोमवारी जिल्ह्याच्या विविध भागात हजारो मुस्लीम बांधवांनी ईद ऊल अजहा (बकरी ईद) च्या नमाजमध्ये अल्लाहकडे करत पूरग्रस्तांसाठी रोख स्वरूपात तसेच अन्नधान्य, तांदूळ, नविन कपडे आदी जीवनावश्यक वस्तू जमा करून ‘हम सब एक है’ असा संदेश देत सामाजिक एकात्मता व माणुसकीचे दर्शन घडविले.

  • राहुरी, नेवासा, राहाता, कोपरगाव, नगर, बेलापूर, तिसगाव, तळेगाव दिघेसह अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांची आर्थिक मदत
  • कर्जतमध्ये मदतनिधी तहसीलदारांकडे सुपूर्त
  • पाथर्डीत 50 हजारांचा निधी संकलीत, गावागावांत मदतनिधी गोळा करणार
  • पाचेगावात वृक्षारोपण

श्रीरामपूर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – मुस्लीम बांधवांचा वर्षातील दुसरा मोठा सण, हजरत इस्माईल अलैसलाम यांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा बकरी ईदचा सण काल शहर व तालुक्यात परंपरागत श्रध्देने, शांततेत व भक्तिभावात साजरा करण्यात आला. या निमित्ताने काल सकाळी शहरातील विविध मशिदींसह ईदगाह मैदानात ईदची नमाज अदा करण्यात आली.
गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसाच्या रिपरिपीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील जवळपास सर्वच मशिदींमधून ईद उल अजहाची नमाज आदा करण्यात आली. ईदगाहमध्येही नमाज पठण करण्यात आले. जामा मशिदीत मौलाना मोहमद इमदादअली यांचे धार्मिक प्रवचन झाले. मुफ्ती अतहर हसन यांनी नमाजची इमामत केली. ईदगाहमध्ये शहर काझी मौलाना सय्यद अकबर अली यांनी तर मदिना मशीद मरकज येथे मौलाना अब्दुल कुद्दूूस यांनी इमामत केली. गौसिया मशिदीत हाफिज अब्दुल हमीद तर कबरस्तानातील गरीब नवाज मशिदीत मौलाना हाफिज जोहर अली यांनी ईदच्या नमाजची इमामत केली. फातेमा कॉलनीतील मस्जीद ए रहेमतेआलम व मुसा मशिदीतही ईदची नमाज आदा करण्यात आली.
ईदगाह व जामा मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आ. भाऊसाहेब कांबळे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मार्केट कमिटीचे सभापती सचिन गुजर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष लकी सेठी, आरपीआयचे राजाभाऊ कापसे, सुभाष आदिक, नगरसेवक दिलीप नागरे, महेंद्र त्रिभुवन, विजय खाजेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक राहुल मदने, पो. नि. श्रीहरी बहिरट, अरुण मंडलिक उपस्थित होते. ईदगाह कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी आ. कांबळे यांना गेल्यावर्षी आपण ईदगाहसाठी आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी जाहीर केला. त्याचे पत्रही दिले. परंतु तो अद्याप मिळाला नसल्याचे सांगून या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यावर आ. कांबळे यांनी मी पैसे कलेक्टरकडे वर्ग केले आहेत. ते अद्याप का मिळाले नाही याचा पाठपुरावा करू आणि महिन्याभरात सदरची रक्कम कमिटीला उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. जामा मशिदीत शकूरभाई शेख, डॉ. राज शेख, तनवीर रजा यांनी पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचालन सलीमखान पठाण यांनी केले. ईदगाहमध्ये मुजफ्फर शेख, मुख्तार शहा, गफार पोपटिया, जिकर जुनानी आदींनी स्वागत केले. नमाजानंतर कुर्बानीचे विधी पार पडले. गोवंशहत्या बंदीमुळे बोकडांची कुर्बानी देण्यात आली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

अतिवृष्टीमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून रक्षा करावी –

राहुरीत मुस्लीम बांधवांची अल्लाहकडे प्रार्थना; पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करून दिला मानवतेचा संदेश

राहुरी स्टेशन (वार्ताहर) – राज्यासह देशाच्या अन्य भागांत अतिवृष्टीमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून अल्लाहने सर्वांची रक्षा करावी, जीवितहानी व आर्थिक नुकसान टळावे, सर्व जाती-धर्मात सलोखा राहून राष्ट्रीय एकात्मता वाढून देशात शांतता नांदावी, सुबत्ता व्हावी, अशी सामुदायिक प्रार्थना काल सोमवारी राहुरी येथे ईदगाह मैदानात हजारो मुस्लीम बांधवांनी डोळ्याच्या कडा पाणवत ईद ऊल अजहा (बकरी ईद) ची नमाजमध्ये अल्लाहकडे करीत पूरग्रस्तांसाठी रोख स्वरूपात तसेच अन्नधान्य, तांदूळ, नवीन कपडे आदी जीवनावश्यक वस्तू जमा करून ‘हम सब एक है’ असा मानवतेचा संदेश देत ईद साजरी केली.
राहुरी शहरातील ईदगाह मैदानात जामा मस्जिदचे इमाम मौलाना मुफ्ती मुज्जमील साहब, मुफ्ती अफजल साहब कादरिया मस्जिदचे मौलाना कमर आलम, चिस्तीया मस्जिदचे मौलाना अस्लमसाहब, रोशन मस्जिदचे मौलाना हाफिज इब्राहीम, मदिना मस्जिदचे मौलाना हाफिज इस्माईल, खानकाह मस्जिदचे मौलाना कदिरसाहब यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो मुस्लीम बांधवांनी ईदच्या नमाजाचे पठण केले. यावेळी राज्यातील कोल्हापूर, सांगली व देशाच्या इतर ठिकाणी ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावलेल्यांना दु:खद अंत:करणाने श्रध्दांजली अर्पण करून संकटात सापडलेल्या बंधुभगिनींसाठी मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले असता उपस्थित मुस्लिम बांधवांनी स्वयस्फूर्तीने मदत जमा केली. तसेच आणखी दोन दिवस शहर व तालुक्यातून ही मदत जमा करून ती प्रशासनाकडे जमा करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या उपक्रमाचे राहुरी कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, पो. नि. मुकुंद देशमुख, एपीआय सचिन बागुल, पीएसआय गणेश शेळके, साहेबराव म्हसे आदींनी कौतुक करीत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या सर्वांचा मुफ्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर पोलीस प्रशासनाच्यावतीने ईदगाह मैदानात गुलाबपुष्प देऊन मुस्लीम बांधवांचे स्वागत करण्यात आले.
तालुक्यातील बारागाव नांदूर, मुळानगर, वांबोरी, उंबरे, ब्राह्मणी, मानोरी, मांजरी, टाकळीमियॉ, लाख, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, गुहा, सोनगाव, सात्रळ, कानडगाव, निंभेरे, कोल्हार आदी ठिकाणी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईद निमित्ताने ठिकठिकाणी झालेल्या नमाजाच्यावेळी सर्वधर्मीय बांधवांनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
ईदनिमित्त माजी खासदार प्रसाद तनपुरे, आ. शिवाजीराव कर्डिले, माजी आ. चंद्रशेखर कदम, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील, प्रेरणा समुहाचे संस्थापक सुरेश वाबळे, साई आदर्शचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, जि.प. सदस्य धनराज गाडे, माजी जि.प. अध्यक्ष अरुण कडू, बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य अजित कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम, डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, सभापती मनीषा ओहळ, अ‍ॅड. तानाजी धसाळ, चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, रावसाहेबचाचा तनपुरे, नगरसेवक नितीन तनपुरे, आर. आर. तनपुरे, अनिल कासार, केशरबाई पतसंस्थेचे अध्यक्ष सागर तनपुरे, नगरसेवक बाळासाहेब उंडे, शहाजी जाधव, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ, आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चोथे, प्रभाकर गाडे, जालिंदर गाडे, मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक शिवाजी सागर, अनिल शिरसाठ, दिलीप जठार, डी. के. कणसे, सुरेश निमसे, विजय कातोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, उद्योचक नितीन ढोकणे, मधुकर तारडे, अनिलराव इंगळे, मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे, राजेंद्र लबडे, मधुकर म्हसे, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, उत्तमराव म्हसे, प्रिन्सीपल मोहनीराज होन, बाळासाहेब पेरणे, रवींद्र म्हसे, अनिल आढाव, आरडगावचे सरपंच कर्णा जाधव, उपसरपंच सुनील मोरे, दादा पाटील सोनवणे, राजेंद्र उंडे, सूर्यभान म्हसे, इंद्रभान पेरणे, किशोर दौलतराव जाधव, दिलीप गोसावी, कैलास शेळके, गोरक्षनाथ तारडे, ज्ञानेश्वर गाडे, रिपाइंचे सुरेंद्र थोरात, विलास साळवे, समता परिषदेचे मच्छिंद्र गुलदगड, सावता माळी संघाचे सचिन गुलदगड, सुनील गुलदगड आदींनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!