दत्तकग्राम प्रवरासंगमला कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांची भेट

0
दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतलेल्या प्रवरासंगम येथे हुमणीग्रस्त ऊस पिकाची पाहणी करताना कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचे पथक. समवेत शेतकरी.

हुमणीग्रस्त ऊस व बोंडअळीग्रस्त कापूस पिकाची पाहणी करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन

नेवासा (का. प्रतिनिधी) – कृषी विज्ञान केंद्र, दहिगावने यांच्यावतीने प्रवरासंगम गावाची दत्तक ग्राम म्हणून निवड करण्यात आली असून त्याअंतर्गत शेतकरी समूह चर्चा व हुमणी अळीग्रस्त ऊस आणि गुलाबी बोंडअळी नियोजनाकरिता कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी कापूस पिकाच्या शेतास भेटी दिल्या. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गाव पातळीवर विविध उपक्रमांत सहभागी होऊन उपस्थित मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संखेने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, दहिगावने यांच्यावतीने भारत सरकारच्या धोरणानुसार शेतकर्‍यांचे उत्पादन दुप्पट करण्याच्या अनुषंगाने 5 वर्षाचा कृती आराखडा तयार करून विविध उपक्रमांचे मदतीने ते शक्य करणे याबाबतचे नियोजन केलेले आहे. याच अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेस गावत विविध शेतकर्‍यांच्या शेतावर गावातील सर्वच शेतकर्‍यांसाठी बैठीकीचे आयोजन करण्यात येते. गावातील प्रगतिशील शेतकरी संजय परभणे यांच्या शेतावर या महिन्याचा कार्यक्रम पर पडला. चालू परिस्थितीमधील शेतकर्‍यांच्या समस्या यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये हुमणी कीड ग्रस्त ऊस आणि गुलाबी बोंड अळीचे प्रभावी नियंत्रण कसे करावे याबद्दल चर्चा झाली.

पुढील हंगामातील प्रमुख पिके कांदा व हरभरा याचे काटेकोर नियोजन कसे असावे याबद्दल देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ माणिक लाखे, नंदकिशोर दहातोंडे, सचिन बडधे, डॉ. सोमनाथ भास्कर, राहुल कावळे, प्रकाश बहिरट यांनी उत्तरे दिली. यावेळी जगन्नाथ कोरडे, गजानन चव्हाण, दत्तात्रय बेल्हेकर, महेंद्र काळे, दादा झावरे, लक्ष्मण सुडके, कचरू पांडव, केशव वाघमारे, नितीन सुडके यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या उपक्रमाबद्दल गावातील शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त करून कृषी विज्ञान केंद्राचे आभार मानले.

हुमणी नियंत्रण करण्यासाठी फक्त रासायनिक कीडनियंत्रण पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक पद्धतीचा अवलंब पुढील हंगामापासून केल्यास ते जास्त प्रभावी ठरू शकेल.
– डॉ. श्यामसुंदर कौशिक (वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, दहिगावने)

LEAVE A REPLY

*