‘हुमणी’ मुळे 38 हजार हेक्टरवरील ऊस संकटात

0

सर्वाधिक श्रीगोंदा, राहुरी, नेवासा तालुक्यांत फटका, सरकारकडून दिलासा नाही

अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाने खंड दिल्याने जिल्ह्यातील ऊस पीक अडचणीत असताना आता हुमणी अळीच्या आक्रमणामुळे ऊस पिकाची वाट लागण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात 38 हजार हेक्टरवरील ऊस पिकाला हुमणीचा दणका बसला आहे. यात सर्वाधिक बाधीत क्षेत्र हे श्रीगोंदा, राहुरी आणि नेवासा तालुक्यांतील आहे. दरम्यान, हुमणीग्रस्त क्षेत्राची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारला सादर करण्यात आली आहे. मात्र, मदत, भरपाईची भाषा सोडा सरकारकडून साधे हुमणीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले गेलेले नाहीत.

ऊस पिकावर हुमणी अळीचा दरवर्षी प्रादुर्भाव असतोच. मात्र, यंदा पावसाने खंड दिल्याने हुमणी अळीने मोठ्या प्रमाणात डोकं वर काढले आहे. हुमणी किडरोगास कारणीभूत असणार्‍या अळीला कुचलेला पाला-पाचोळा, गवत आदी उपलब्ध न झाल्याने या अळीने थेट ऊस पिकाकडे आपला मोर्चा वळविला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात हुमणी पिकाचा प्रार्दुभाव दिसत आहे. या किड रोगाचा बंदोबस्त करतांना शेतकर्‍यांच्या नाकीनऊ आले आहे.
कृषी विभाागाच्या म्हणण्यानुसार हुमणी नियंत्रणासाठी किटक नाशकांसोबत भरपूर पाण्याची आवश्यकता असून या किड रोगातील अळी जोपर्यंत पूर्णपणे दोन सरीतील पाण्यात बुडणार नाहीत. त्याच्या शरिरात किटक नाशकांचे प्रमाण जाणार नाहीत, तोपर्यंत या किड अळीचा बंदोबस्त अशक्य आहे. जिल्ह्यात अनेक भागात हुमणीचा उद्रेक झाला असून पाऊस लांबल्यास हुमणीचा फटकवा वाढणार असल्याची भिती कृषी विभागाला आहे. जिल्ह्यात यंदा 1 लाख 34 हजार हेक्टरवर ऊस पिक उभा आहे. यातील 38 हजार हेक्टरवरील ऊस पिक हुमणीने बाधीत आहे. कृषी विभागाने हुमणीचा उद्रेक झाल्यानंतर तातडीने तालुकानिहाय बाधीत क्षेत्राचे पंचानामे करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारच्या मदत कार्य आणि पुर्नवसन विभागाला त्याचा अहवाल दिलेला आहे. मात्र, सरकारकडून अजून बाधीत ऊसाच्या क्षेत्राचे पंचानामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत.

तालुकनिहाय बाधीतक्षेत्र हेक्टरमध्ये (कंसा लागवड क्षेत्र)
नगर 35 (844), पारनेर 3 हजार (3500), पाथर्डी 1 हजार 45 (8833), कर्जत 350 (5876), जामखेड 310 (4407), श्रीगांेंदा 9 हजार (25278), श्रीरामपूर 2 हजार 539 (9730), राहुरी 5 हजार 583 (20355), नेवासा 4 हजार 100 (34278), शेवगाव 3 हजार 235 (24053), संगमनेर 3 हजार 800 (9124), कोपरगाव 1 हजार 100 (8221), राहाता 3 हजार 696, अकोले 178 (5 हजार 363) यांचा समावेश आहे.

पाऊस आणखीन लांबल्यास हुमणीचा विळखा आणखी घट्ट होणार आहे. यामुळे कृषी विभागाचे डोक चक्रावले असून आता पाऊस झाल्यास हुमणीतून बचाव शक्य असल्याचे सांगण्यात आले. शेतकर्‍यांनी मुबलक पाण्यात कृषी विभागाने सांगितलेल्या किटक नाशकांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास हुमणीचा प्रतिबंध शक्य असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*