सिव्हीलमध्ये उपचार घेतलेले ग्रामीण रुग्ण किती? जि.प. महिला, बालकल्याण समितीचा सवाल

0

नाशिक । जिल्ह्यातून बहुसंख्य गर्भवती महिला प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात. मात्र त्यांना अपुरे बेड, औषधोपचारांचा तुटवडा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून डावलले जाते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातून किती ग्रामीण रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ दिला, असा सवाल जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापतींनी जिल्हा शल्यचिकित्सकांना केला आहे.

सभापती अपर्णा खोसकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारीत उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज चालते. मात्र या रुग्णालयांमध्ये ग्रामीण रुग्णालयांवर अन्याय होतो. औषधांचा तुटवडा, तज्ज्ञांची कमतरता, आधुनिक मशिनरीचा तुटवडा आणि मनुष्यबळ नसल्याचे सांगून ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते.

मात्र इकडे आल्यावर जिल्हा रुग्णालयात खाट-जागेचा अभाव, तात्काळ आरोग्यसेवेचा अभाव असतो. वेळेवर उपचार होत नसल्याने रुग्ण दगावत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. प्रसूतीदरम्यान महिला दगावण्याचे प्रमाण जिल्हा रुग्णालयात वाढले आहे. मुलांचे कुपोषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी महिला व बालकल्याण समितीला ग्रामीण भागातील आंतर व बाह्य विभागात किती रुग्णांवर उपचार झाले याची माहिती द्यावी. तसेच ग्रामीण भागातील किती रुग्णालयांमध्ये महिलांची प्रसूती आणि शस्त्रक्रिया झाली याची अद्ययावत माहिती द्यावी, असे सूचीत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*