घरगुती पाणीपट्टी, घरपट्टी करवाढ वगळण्याचे संकेत

0

नाशिक । महापालिका स्थायी समितीकडून नुकताच करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली असली तरी यावर महासभेत खर्‍या अर्थाने निर्णय होणार आहे.

मात्र शहरातील सर्वसामान्य नागरिकांवर या करांचा बोजा पडू नये, असे आपले मत असून केवळ व्यावसायिक पाणीपट्टी व घरपट्टीवर लक्ष केंद्र केले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी दिली. अशाप्रकारे घरगुती पाणीपट्टी व घरपट्टी करवाढ वगळली जाणार असल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या आ. सानप यांनी दिले आहे.

महापालिका स्थायी समितीने नुकतेच स्मार्ट सिटी प्रकल्प व शहर विकासाची कामे लक्षत घेत घरपट्टीत 18 टक्के आणि पाणीपट्टीत पाच वर्षासाठी 120 टक्के अशी करवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांनी तीव्र विरोधाच्या प्रतिक्रया व्यक्त केल्या होत्या. तसेच शहरातील काही राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांनी करवाढीला विरोध केला आहे.

याच करवाढीचे पडसाद शनिवारी (दि.19) झालेल्या महासभेत उमटले. भाजप वगळता सर्व पक्षीय नगरसेवकांनी करवाढीच्या मुद्यावर भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी सभागृहात मोठा गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. या गोंधळात कोणतीही चर्चा न करता महापौरांना सभा गुंडाळावी लागली होती. या एकूणच घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप शहराध्यक्ष आ. सानप यांनी महापालिकेत येऊन महापौर रंजना भानसी व पदाधिकार्‍यांशी करवाढीसंदर्भात चर्चा केली.

शहर विकास व स्मार्ट सिटी प्रकल्प याकरिता लागणारा महसूल वाढवण्यासाठी अनेक पर्याय असल्याचे सांगत आ. सानप म्हणाले, निवासी घरपट्टी व घरगुती पाणीपट्टीत करवाढ होता कामा नये, अशी आणि सर्वसामान्य नागरिकांवर कराचा बोजा पडू नये, अशी भूमिका आपली आहे. याच पार्श्वभूमीवर आपण महापौर व स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या सोबत चर्चा केली आहे.

शहरातील मिळकत सर्व्हेक्षण झाल्यानंतर उघड झालेल्या नवीन मिळकतीतून मोठा कर वसूल केला जाणार आहे. तसेच शहरातील व्यावसायिक वापर होत असलेल्या मिळकती व बिगर घरगुती पाणीपट्टी दर या माध्यमातून कर वाढू शकतो. तसेच शहरात बांधकाम परवानगी अभावी अनेक इमारतींना अद्यापही घरपट्टी व पाणीपट्टी लागू झालेली नाही. तसेच लहान रस्त्यावरील इमारतीच्या परवानग्या रखडल्या असून यासंदर्भात राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय झाल्यास मोठा महसूल महापालिकेला मिळणार असल्याचेही आ. सानप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*