हॉटमेल हॅक करून कंपनीला लाखोंचा गंडा

0
नाशिक । अगरबत्ती व्यावसायिकाचा हॉटमेल हॅक करून कंपनीचा मालक असल्याचे सांगत 3588 अमेरिकन डॉलरला (भारतीय चलनात 2 लाख 32 हजार रुपये) गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात एका मलेशियन नागरिकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कुमार रसिकलाल बुच (रा. लॅमरोड) यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नंदिनी अगरबत्ती दुकानासाठी चीनमधील कंपनी नॅनिंग एचएसएक्सकडून अगरबत्तीचा माल बुच हे विकत घेतात. सर्व व्यवहार ऑनलाईन होतात. 29 मे रोजी संबंधित कंपनीकडून त्यांना मेल आला होता.

कंपनीच्या ठरलेल्या व्यवहारापेक्षा कमी भावात माल पाठवण्यात येईल. यासाठी आगाऊ रक्कम पाठवावी लागेल, असा मेल पाठवण्यात आला. या मेलला बुच यांनी उत्तर दिले. संशयिताने रक्कम कंपनीच्या चीनमधील बँक खात्यात जमा न करता मलेशियातील क्वालालंपूर येथील बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.

बुच यांनी 3588 अमेरिकन डॉलर या बँकेत जमा केले. कंपनीला पैसे पाठवून माल का येत नाही म्हणून चीनच्या या कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता कंपनीकडे पैसे जमा झाले नसल्याचे त्याने सांगितले. मलेशियामध्ये कंपनीची शाखा नाही, असेही त्याने सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे बुच यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी रविवारी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठण्यात ‘मॅन इन मिडल अटॅक’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार तपास करत आहेत.

‘मॅन इन मिडल अटॅक’चा हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. एक महिन्यापूर्वी ग्राफाईट इंडिया कंपनीच्या मालकाचे हॉटमेल अकाऊंट हॅक करत नाशिक येथील कंपनीच्या वित्त अधिकार्‍याला मालकाच्या नावाने मेल करत सहा लाखांना गंडा घातल्याचे समोर आले होते. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ऑनलाईन व्यवहारामध्ये ‘मेन इन मिडल अटॅक’चे धोके अधिक आहेत. यामुळे रेट कमी करून व्यवहार करण्याचे मेल आल्यास प्रत्यक्ष समोरील कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून खात्री करून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*