राज्यमंत्री सदाभाऊ खोतांसंदर्भातील महिलेच्या तक्रारीचा मुद्दा विधिमंडळात गाजला

0

मुंबई, दि. 31 (प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विषयी गेल्या काही दिवसात वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा विषय आज विधानसभेत निघाला.

मात्र नियमानुसार राज्यमंत्र्यांना नोटीस दिलेली नाही म्हणून त्यांचे नाव घेत नाही असे म्हणत अजित पवार यांनी हा विषय उपस्थित केला.

प्रश्नोत्तरे समाप्त होताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उभे राहिले आणि त्यांनी म्हटले एका राज्यमंत्र्यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील एका महिलेने तक्रारी केल्या आहेत.

गंभीर आरोप केले आहेत त्यांची चौकशी सरकारने करावी अशी मागणी अजीतदादांनी केली. त्यांनी त्या महिलेच्या तक्रारीतील तपशील वाचून दाखवला. राज्यमंत्र्यांनी षडयंत्र रचले आहे माझ्याविरोधात सहा लाखाचे प्रकरण दाखल झाले आहे.

ताई म्हणून सुरुवात करून माझ्याशी गैरवर्तन केले असेही त्या महिलेने तक्रारीत म्हटल्याचा उल्लेख दादांनी केला. सत्तारूढ बाजूने कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपा सदस्य तसेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हरकती घेतल्या. खडसे म्हणाले की माझी माहिती आहे की त्या महिलेने तक्रार मागे घेतलेली आहे.

अजित पवार म्हणाले की माझ्याकडे सीडी आहे. तिच्या तक्रारीची ती तुम्हाला देऊ का? खडसे म्हणाले की माझ्याकडे कागद आहे तोही आजचा आहे. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटले की अजित पवार यांनी जे सांगितले त्यांनी संबंधित राज्यमंत्र्यांचे नाव घेतले असते तर मी चौकशी करून निवेदन करायला सांगितले असते

आता फक्त चौकशी करायला सांगतो आहे. त्यावर विरोधी पक्ष उभे राहिले आणि कारवाईचा आग्रह धरू लागले. मात्र अध्यक्षांनी लक्षवेधी सूचना पुकारली तेंव्हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी अजित पवारांच्या मुद्दासंदर्भात निवेदन केले व स्पष्ट केले की संबंधित महिलेने महिला पोलीस अधिकारी तसेच समाजिक कार्यकर्त्यांच्या समोर निवदेन दिले असून आपली तक्रार गैरसमजुतीने केल्याचे सांगितले आहे.

तिचा व प्रशांत जाधव यांचा काही वाद असून ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यात जाधव यांना राज्यमंत्री मदत करतात अशा गैरसमजाने व त्या रागातून राज्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रारअर्ज केला होता तो आता मागे घेत आहे असे त्या महिलेने लिहून दिले असून याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा विषय आता संपला असेही त्यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

*